मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचा विशेष सन्मान; ‘निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाचा दिमाखदार समारोप
‘निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्याची दखल; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडूनही कुशल जैन यांच्या नेतृत्वाचे कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचा विशेष सन्मान; ‘निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाचा दिमाखदार समारोप
‘निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्याची दखल; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडूनही कुशल जैन यांच्या नेतृत्वाचे कौतुक
पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाचा तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. या समारोप सोहळ्यात आषाढी यात्रेदरम्यान केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालेला हा गौरव सोलापूर जिल्हा परिषदेसाठी अभिमानाचा क्षण ठरला.

आषाढी वारीसाठी लाखो वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आणि प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाची राज्य शासनाने विशेष दखल घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, स्नानगृहे, विश्रांती केंद्रे, मोबाईल चार्जिंग सुविधा, वैद्यकीय सेवा आणि विविध विभागांमधील प्रभावी समन्वयामुळे यंदाची वारी अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि नियोजनबद्ध झाली.

कार्यक्रमात बोलताना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सीईओ कुशल जैन यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, आषाढी वारीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रभावी नियोजन, प्रशासनातील समन्वय आणि वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात कुशल जैन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वामुळे सोलापूर जिल्हा परिषद राज्यातील आदर्श प्रशासन म्हणून पुढे आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राची संतपरंपरा आणि वारी ही राज्याची सांस्कृतिक ओळख असल्याचे सांगत, लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ‘चरणसेवा’ उपक्रमातून डॉक्टर, स्वयंसेवक आणि युवकांनी केलेली निस्वार्थ सेवा ही महाराष्ट्राच्या युवा शक्तीचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
यंदाच्या आषाढी वारीत सुमारे ३० ते ३५ लाख वारकऱ्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. या कालावधीत स्वच्छता, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहे, स्नानगृहे, विश्रांती केंद्रे, मोबाईल चार्जिंग सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच ‘चरणसेवा’ उपक्रमातून हजारो वारकऱ्यांना मोफत उपचार आणि औषधोपचाराचा लाभ मिळाला.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचे सांगत चंद्रभागा नदी परिसर, वाळवंट आणि संपूर्ण पंढरपूर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी केलेल्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वारी घडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे केलेले काम राज्यासाठी आदर्श ठरल्याचे नमूद केले.
समारोप कार्यक्रमात ‘निर्मलवारी–समृद्धवारी’ आणि ‘चरणसेवा’ उपक्रमांवरील माहितीपट सादर करण्यात आला. यावेळी विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, स्वच्छता कर्मचारी, वैद्यकीय पथके आणि सेवाभावी कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, आमदार समाधान आवताडे, गोपीचंद पडळकर, मंगेश चव्हाण, माजी आमदार प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



