२० मार्चपूर्वी अध्यक्ष-सभापती निवड; ग्रामविकास विभागाचे अधिकृत पत्र जारी
२० मार्चपूर्वी अध्यक्ष-सभापती निवड; ग्रामविकास विभागाचे अधिकृत पत्र जारी
सोलापुरात सत्ता समीकरणांची लगबग!
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती पदांच्या निवडीसंदर्भात राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे.

या पत्रानुसार, संपूर्ण निवड प्रक्रिया २० मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना अचानक वेग आला असून विविध गट-तटांमध्ये चर्चा आणि रणनीती आखण्याचे सत्र सुरू झाले आहे.
सोलापूर जिल्हा परिषद आणि तालुकास्तरावरील पंचायत समित्यांमध्ये अध्यक्ष व सभापती पदांसाठी इच्छुकांची चढाओढ वाढली आहे. काही ठिकाणी आघाड्या-जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, पक्षांतर्गत बैठका आणि मतदार सदस्यांशी संपर्क मोहीमही वेगाने सुरू आहे.
राजकीय नेत्यांनी आपल्या गटबांधणीसाठी हालचाली सुरू केल्या असून, अपक्ष सदस्यांची भूमिकाही निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
*‘कोणाच्या गळ्यात माळ?’*
जिल्ह्यातील सत्तासमीकरणे नेमकी कशी जुळतात, कोणत्या गटाला बहुमत मिळते आणि अध्यक्ष-सभापती पदांची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही ठिकाणी आरक्षणाच्या गणितामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी अनुभवी नेत्यांची पुन्हा निवड होण्याची चर्चा आहे.
राजकीय वातावरण दिवसेंदिवस चुरशीचे होत असून, पुढील काही दिवस जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणावर या निवडींचा मोठा प्रभाव पडणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.



