सोलापूर

ग्रामीण महिलांच्या स्वप्नांना मिळणार नवे पंख… सोलापुरात काय घडणार १ मार्चपासून ?

ग्रामीण महिलांच्या स्वप्नांना मिळणार नवे पंख… सोलापुरात काय घडणार १ मार्चपासून ?

सोलापूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांना आर्थिक व सामाजिक सबलीकरणाची संधी देण्यासाठी ‘रुक्मिणी महोत्सव – मिनी सरस विक्री व प्रदर्शन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव दि. १ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत नॉर्थकोट मैदान, सोलापूर महानगरपालिका समोर येथे भरविण्यात येणार आहे.

या प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

*भव्य उद्घाटन सोहळा*

महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दि. १ मार्च २०२६ रोजी दुपारी १.०० वा. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून सुमारे ७५ स्टॉल्स तसेच इतर जिल्ह्यांतील ५ स्टॉल्स सहभागी होणार आहेत.

*प्रमुख उत्पादने*

सोलापुरी कडक भाकरी, शेंगाचटणी
दुग्धजन्य पदार्थ, मसाले
हस्तकला वस्तू, लाकडी बैलगाडी व खेळणी
कापडी पिशव्या, लोकरी घोंगडी
मिलेट्स पदार्थ व कुकीज
कोल्हापुरी चप्पल
सेंद्रिय डाळी, फळे व भाजीपाला

ग्रामीण चवींचा आस्वाद घेण्यासाठी खेकडा, उजनी मासे, बिर्याणी, शाकाहारी जेवण तसेच पंढरपूरची बाजार आमटी यांसारखे खास पदार्थ उपलब्ध असणार आहेत.

प्रदर्शनासोबतच दररोज सायंकाळी मनोरंजनासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

* १ मार्च (रविवार) : सकाळी ११ ते १ – येडवे-बिदरकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम

* २ मार्च (सोमवार) : तुळजाभवानी महिला स्वयं सहाय्यता समूह, टेभूणर्णी यांचा भारुड

* ३ मार्च (मंगळवार) : ‘खेळ पैठणीचा’ – सायं. ५ ते ८

* ४ मार्च (बुधवार) : AS म्युझिक ऑर्केस्ट्रा – सायं. ५ ते ८

* ५ मार्च (गुरुवार) : उमेद महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम – दुपारी ३ ते ५
समारोप : ५ मार्च रोजी सायं. ५ वाजता

*महिलांसाठी विशेष सोय*

ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला स्वयंसहाय्यता समूह सदस्यांसाठी राहण्याची व जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

उमेद अभियानांतर्गत ग्रामीण महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा देण्यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढणार असून आर्थिक बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.

सोलापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण उत्पादनांची खरेदी करावी व अस्सल ग्रामीण मेजवानीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!