विठ्ठलाच्या महापूजेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होणार नवा रेकॉर्ड, कोणाच्या नावावर आहे हे मान
आषाढी एकादशीनिमित्त पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; राज्याच्या राजकीय इतिहासात विशेष नोंद

विठ्ठलाच्या महापूजेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होणार नवा रेकॉर्ड, कोणाच्या नावावर आहे हे मान
आषाढी एकादशीनिमित्त पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; राज्याच्या राजकीय इतिहासात विशेष नोंद
पंढरपूर, दि. २४ : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर शनिवारी (२५ जुलै) पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा पार पडणार आहे. पहाटे सुमारे २.२० ते ३.०० या वेळेत होणाऱ्या या पूजेसाठी मंदिर समिती, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

यंदाची महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विशेष ठरणार आहे. कारण मुख्यमंत्री म्हणून ते सहाव्यांदा श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार आहेत. यापूर्वी त्यांनी २०१४, २०१५, २०१६, २०१८ आणि २०१९ या वर्षांत महापूजा केली होती. यंदाच्या पूजेनंतर ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावावर असलेल्या सहा शासकीय महापूजांच्या विक्रमाशी बरोबरी करणार आहेत.
राज्याच्या राजकीय इतिहासात विलासराव देशमुख यांचे नाव सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री म्हणून श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करणाऱ्या नेत्यांमध्ये अग्रस्थानी आहे. अनेक वर्षे हा विक्रम त्यांच्या नावावर कायम राहिला. आता देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा महापूजा करून त्या विक्रमाशी समकक्ष ठरणार असल्याने हा क्षण ऐतिहासिक मानला जात आहे.
आषाढी वारीसाठी राज्यासह देशभरातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. महापूजेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात प्रवेश व्यवस्था, दर्शन नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क ठेवण्यात आली आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी प्रदर्शनाला भेट देणार असून, गुणवंत शेतकऱ्यांचा सन्मान तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे आषाढी एकादशीचा धार्मिक सोहळा आणि शेतकरी सन्मानाचा कार्यक्रम एकाच दिवशी पार पडणार असून, राज्याचे लक्ष या कार्यक्रमांकडे लागले आहे.



