सोलापूर

गटशिक्षणाधिकाऱ्यांवरील कारवाई प्रलंबित; कट्टीमनींचे आमरण उपोषण, शिक्षण विभागात खळबळ

गटशिक्षणाधिकाऱ्यांवरील कारवाई प्रलंबित;
कट्टीमनींचे आमरण उपोषण, शिक्षण विभागात खळबळ

सोलापूर (प्रतिनिधी) :- अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र राज्य मागासावर्गीय शिक्षक संघटना शाखा अक्कलकोटचे अध्यक्ष महांतेश्वर हणमंतराव कट्टीमनी यांनी २३ फेब्रुवारी २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कथित कारभारावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन छेडले आहे.

*तक्रारीचा निर्णय अद्याप प्रलंबित*

कट्टीमनी यांनी दिलेल्या पत्रानुसार, सप्टेंबर २०२४ मध्ये अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री. प्रशांत अरबाळे यांनी विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या केल्याबाबत त्यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी झाली असली, तरी अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, असा त्यांचा आरोप आहे.

तक्रार केल्याच्या पार्श्वभूमीवर स्वतःचे निलंबन करण्यात आले आणि सुमारे एक वर्षानंतर पुनर्स्थापनेचे आदेश व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच चौकशी पूर्ण होऊनही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात टाळाटाळ होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

कट्टीमनी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून उदरनिर्वाह भत्ता देण्यात आलेला नाही, त्यामुळे आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. संबंधित फाईल गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असून, जिल्हा परिषद सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांनी जबाबदार धरले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्र जारी करून कट्टीमनी यांना पुनर्स्थापित ठिकाणी  जि.प.प्रा. कन्नड शाळा, म्हैसलगे (ता. अक्कलकोट)  येथे तात्काळ हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रुजू अहवाल सादर न केल्यास वेतनाबाबत उद्भवणाऱ्या प्रश्नांसाठी ते वैयक्तिकरीत्या जबाबदार राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

*‘व्हॉट्सअ‍ॅपवर पत्र पाठवणे योग्य का?’ कट्टीमनींचा सवाल*

कट्टीमनी यांच्या मते, अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभागातील लिपिकांकडून संबंधित पत्र २६ व २७ फेब्रुवारी रोजी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवण्यात आले. मात्र पत्रावर दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ असा उल्लेख आहे. अधिकृत पत्र हातोहात न देता केवळ व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवणे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तारखांमधील तफावत दिशाभूल करणारी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

गटशिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध महिला शिक्षकांच्या तक्रारींसह इतर अनेक तक्रारी प्रलंबित असल्याचा दावा कट्टीमनी यांनी केला आहे. या सर्व तक्रारींवर निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

*प्रशासनाची भूमिका अपेक्षित*

या प्रकरणामुळे अक्कलकोटमधील शिक्षण विभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून अधिकृत भूमिका आणि पुढील कारवाईबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, २३ फेब्रुवारीपासून सुरू झालेले आमरण उपोषण अद्याप सुरू असून, परिस्थितीवर स्थानिक प्रशासन लक्ष ठेवून आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!