राज्याच्या परिवहन खात्याला नवे नेतृत्व; आयएएस राजेश नार्वेकर यांची आयुक्तपदी नियुक्ती

राज्याच्या परिवहन खात्याला नवे नेतृत्व; आयएएस राजेश नार्वेकर यांची आयुक्तपदी नियुक्ती
मुंबई (प्रतिनिधी):- राज्याच्या परिवहन विभागात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून आयएएस अधिकारी राजेश नार्वेकर यांची महाराष्ट्राचे नवे परिवहन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान परिवहन आयुक्त विवेक भिमनवर यांची एमपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
राजेश नार्वेकर हे यापूर्वी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागात आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रशासनातील प्रदीर्घ अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे परिवहन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
*प्रशासनातील प्रदीर्घ कारकीर्द*
राजेश नार्वेकर हे 2009 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी असून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. 1994 साली महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतून उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.
त्यांनी म्हाडा, नोंदणी व मुद्रांक विभाग तसेच एमआयडीसी येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
*जिल्हाधिकारी ते महापालिका आयुक्त*
2018 ते 2022 या कालावधीत त्यांनी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला. या काळात विविध विकासकामे, निवडणुका व प्रशासनिक सुधारणा यामध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली.
ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 दरम्यान त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका येथे आयुक्तपद भूषवले. तसेच 2016 ते 2017 या काळात रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले.
*पुरस्कार व विशेष योगदान*
‘स्वच्छ भारत मिशन’मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बजावलेल्या चोख जबाबदारीबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रभावी उपाययोजना राबवल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्यांना ‘सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (DMIC) सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. या प्रकल्पासंदर्भात त्यांनी जपानमधील ओसाका येथे विशेष प्रशिक्षण घेतले होते.
*परिवहन विभागासमोरील आव्हाने*
राज्यातील वाहननोंदणी, परवाने, रस्ता सुरक्षा, सार्वजनिक परिवहन व्यवस्थेतील सुधारणा आणि डिजिटल सेवा विस्तार यांसारखी अनेक महत्त्वाची आव्हाने परिवहन विभागासमोर आहेत. प्रशासनातील व्यापक अनुभवाच्या जोरावर राजेश नार्वेकर हे या विभागात कार्यक्षमतेला नवे बळ देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



