महाराष्ट्र

लाँगमार्च प्रणेते जोगेंद्र कवाडे यांच्या सहचारिणी रंजनाआई कवाडे यांचे निधन; चळवळीची मूक शक्ती हरपली

लाँगमार्च प्रणेते जोगेंद्र कवाडे यांच्या सहचारिणी रंजनाआई कवाडे यांचे निधन; चळवळीची मूक शक्ती हरपली

सोलापूर :- लाँगमार्च चळवळीचे प्रणेते जोगेंद्र कवाडे यांच्या सहचारिणी, संघर्षाची निःशब्द साक्षीदार आणि चळवळीची मूक शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माता रंजनाआई कवाडे यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने दलित चळवळीत हळहळ व्यक्त होत असून विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

रंजनाआई या केवळ एका नेत्याच्या पत्नी नव्हत्या, तर त्या संपूर्ण चळवळीचा आधारवड होत्या. दलित समाजाला आत्मसन्मान आणि स्वाभिमान मिळवून देण्यासाठी उभारलेल्या लाँगमार्च आंदोलनात कवाडे साहेब जेव्हा आघाडीवर लढत होते, तेव्हा त्यांच्या पाठीशी न डगमगता उभी राहणारी ताकद म्हणजे रंजनाआई होत्या.

*संघर्षातील खंबीर साथ*

लाँगमार्च आंदोलनाच्या काळात अनेक वेळा तुरुंगवास, सामाजिक दबाव आणि आर्थिक अडचणींचे प्रसंग आले. मात्र या कठीण काळातही रंजनाआईंनी खंबीरपणे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत चळवळीच्या विचारांशी तडजोड केली नाही.
नेता रस्त्यावर लढत असतो, तेव्हा त्याच्या कुटुंबालाही तितक्याच धैर्याने संघर्ष करावा लागतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे रंजनाआईंचे आयुष्य होय.

*चळवळीतील मूक शक्ती*

समाजपरिवर्तनाच्या लढ्यात अनेकदा मंचावर दिसणाऱ्या व्यक्तींना गौरव मिळतो; परंतु त्यांच्या मागे उभ्या असलेल्या कुटुंबाच्या त्यागाकडे दुर्लक्ष होते. रंजनाआईंनी कोणताही गाजावाजा न करता, निःशब्दपणे चळवळीला बळ दिले. त्यांच्या संयम, त्याग आणि धैर्यामुळेच कवाडे साहेबांना सामाजिक लढा अधिक जोमाने पुढे नेता आला, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

*सर्व स्तरांतून श्रद्धांजली*

रंजनाआईंच्या निधनाची बातमी समजताच सामाजिक व राजकीय क्षेत्रातून शोकसंदेश व्यक्त करण्यात आले. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत अनेकांनी “चळवळीची मूक शक्ती हरपली” अशी भावना व्यक्त केली आहे.

रंजनाआईंचे योगदान हे केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसून ते सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात कायम स्मरणात राहील. त्यांच्या संघर्षमय आयुष्याची प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!