‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये अक्कलकोट नगरपरिषद राज्यात द्वितीय; 6.50 कोटींचा मानाचा धनादेश

‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये अक्कलकोट नगरपरिषद राज्यात द्वितीय; 6.50 कोटींचा मानाचा धनादेश
मुंबई (प्रतिनिधी):- पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने उल्लेखनीय कामगिरी करत अक्कलकोट नगरपरिषदेला ‘माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळा – 5.0’ मध्ये महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. भूमी घटकात विशेष पारितोषिक आणि उंच उडी प्रकारातही गौरव प्राप्त करत अक्कलकोटने राज्यभरात आपला ठसा उमटवला.
हा सन्मान सोहळा मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, लाला लजपत राय मार्ग येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात अक्कलकोट नगरपरिषदेला सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 6 कोटी 50 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव जयश्री भोज आणि आयुक्त प्रवीण देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्तेही या वेळी उपस्थित होते.
अक्कलकोट नगरपरिषदेच्या नागरिक, प्रशासनातील अधिकारी व पदाधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. स्वच्छता, हरित उपक्रम, जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सातत्याने काम केल्यामुळे अक्कलकोटला हा मानाचा तुरा मिळाला आहे.
मिळालेला 6.50 कोटी रुपयांचा निधी शहरातील पर्यावरणपूरक प्रकल्प, हरित क्षेत्रवाढ, कचरा व्यवस्थापन सुधारणा आणि जलसंधारण योजनांसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या यशामुळे अक्कलकोटच्या विकासाला नवी दिशा आणि गती मिळणार आहे.
अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे हे यश शहरासाठी अभिमानास्पद ठरले असून, पुढील काळातही पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात आघाडी कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



