एक लाखांच्या नोटांनी उघडला मोठा खेळ; एसीबीच्या धाडीत साहेबच जाळ्यात
एक लाखांच्या नोटांनी उघडला मोठा खेळ; एसीबीच्या धाडीत साहेबच जाळ्यात
मुंबई (प्रतिनिधी):- खाकी वर्दीत लपलेला एक गूढ व्यवहार… तक्रारदाराची धाडसी पावले… आणि अचानक रचलेला सापळा! अखेर सर्व काही एका क्षणात उघड झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने कारवाई करत कुरार पोलीस ठाणे येथील दोन पोलीस अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आणि संपूर्ण प्रकरणाने खळबळ उडाली.
घटनाक्रम जणू एखाद्या थरारक कथेसारखा उलगडत गेला. तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप होता. यातील दोन लाख रुपये आधीच घेतले गेले होते. मात्र उर्वरित एक लाख रुपये देण्याऐवजी तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव घेतली आणि इथूनच सुरू झाला सापळ्याचा प्लॅन.
बुधवारी रात्री ठरल्याप्रमाणे व्यवहार सुरू झाला… नोटांची अदलाबदल होताच एसीबीचे अधिकारी क्षणार्धात सक्रिय झाले. कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि पीएसआय ज्ञानेश्वर जुन्ने यांना रंगेहात पकडण्यात आले. पण खरी धक्का देणारी गोष्ट अजून बाकी होती.
अटकेनंतर केबिनमध्ये झाडाझडती सुरू झाली… फाईल्स, ड्रॉवर, कपाट तपासले जाऊ लागले… आणि अचानक समोर आली रोकड — एक-दोन नव्हे तर तब्बल ६ लाख ३४ हजार रुपये! इतकी मोठी रक्कम पाहून एसीबी अधिकारीही काही क्षण थक्क झाले. लगेच पंचनामा करून संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एसीबीकडून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्यांना २३ तारखेपर्यंत एसीबी कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, “भ्रष्टाचाराला कुठलाही माफ नाही” असा इशारा देत अशा प्रकरणांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे. या धाडीनंतर आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, तपासाची दिशा आता अधिक गंभीर वळणावर पोहोचली आहे.


