क्राईम

अक्कलकोट तालुक्यात धक्कादायक प्रकार : जावयाकडून सासऱ्याची शेतात हत्या

अक्कलकोट तालुक्यात धक्कादायक प्रकार : जावयाकडून सासऱ्याची शेतात हत्या

अक्कलकोट (प्रतिनिधी):- अक्कलकोट तालुक्यातील इंगळगी गावात आज सकाळी एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली. शेतात झालेल्या वादातून जावयाने सासऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत व्यक्तीचे नाव सिकंदर मुलका शेख असे असून आरोपी जावयाचे नाव सादिक सैफन दफेदार असे आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सादिक दफेदार याने शेतात सिकंदर शेख यांच्यावर धारदार चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या सिकंदर शेख यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर आरोपी सादिक दफेदार याने स्वतःवरही चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी अवस्थेत त्याला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या पंचनामा व पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू असून नेमका वाद कशामुळे झाला याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मृत सिकंदर शेख यांचा मुलगा आणि मुलगी पोलीस खात्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे या घटनेला अधिक गांभीर्य प्राप्त झाले असून संपूर्ण तालुक्यात या घटनेची चर्चा सुरू आहे.

या घटनेमुळे इंगळगी गावासह संपूर्ण अक्कलकोट तालुका हादरला असून पुढील तपासात खूनामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!