सोलापूरकरांसाठी दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन; महापौर विनायक कोंड्याल यांची प्रशासनाला कडक सूचना

सोलापूरकरांसाठी दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन; महापौर विनायक कोंड्याल यांची प्रशासनाला कडक सूचना
‘दैनिक प्रबुद्ध राज न्यूज’च्या बातमीची दखल
सोलापूर (प्रबुध्द राज न्यूज) :- सोलापूर महानगरपालिका येथे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी आज महापौरांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक पार पडली. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वेळेत, सुरळीत आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा कसा करता येईल यावर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीस सभागृहनेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीष पंडित, मनीषा मगर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, सतीश एकबोटे, सिद्धेश्वर उत्सुरगे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील विविध भागांना सध्या किती दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो, वितरण व्यवस्थेतील अडचणी, पंपिंग यंत्रणा, गळतीची समस्या, उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी उन्हाळ्यातील संभाव्य टंचाई यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
*दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा आराखडा सादर करण्याचे निर्देश*
महापौर विनायक कोंड्याल यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, “सोलापूरकरांना नियमित आणि वेळेत पाणी मिळणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी, मनुष्यबळ, पाणी साठवणूक व वितरण यांचा सविस्तर कृती आराखडा तातडीने सादर करावा.”
उपस्थित अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक तांत्रिक तपशील संकलित करण्यासाठी काही कालावधीची मागणी केली. त्यानुसार लवकरच सविस्तर कृती आराखडा सादर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
पाणीपुरवठा व्यवस्थेत पूर्वी काम पाहिलेल्या वरिष्ठ व माजी अधिकाऱ्यांशीही चर्चा करून त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. यामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, कार्यक्षम आणि शाश्वत करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
महानगरपालिका नागरिकांना नियोजित व सुरळीत पाणीपुरवठा देण्यासाठी कटिबद्ध असून, लवकरच पुढील आढावा बैठक घेऊन ठोस निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
उन्हाळ्याच्या तोंडावर प्रशासनाकडून होत असलेल्या या हालचालीमुळे सोलापूरकरांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, दैनिक ‘प्रबुद्ध राज न्यूज’मध्ये आज सकाळीच पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महापौरांनी तत्काळ दखल घेत बैठक बोलावल्याची चर्चा नागरिकांतून सुरू आहे.



