सोलापूर

जुळे सोलापुरात सहा दिवसांनी नळ; नागरिक संतप्त, पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह

जुळे सोलापुरात सहा दिवसांनी नळ; नागरिक संतप्त, पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह

उजनी धरण भरलेले असतानाही शहरात टंचाईचे कारण काय? प्रशासनावर टीका

सोलापूर :- जुळे सोलापूर परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, सध्या आठ दिवसांनी नळाला पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वर्षातील ३६५ दिवसांपैकी केवळ सुमारे ५२ दिवसच पाणी मिळत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून, आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांच्या मते, महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना उजनी धरणातून पंपिंग करूनही एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. त्या तुलनेत सध्या उजनी धरण भरलेले असतानाही शहरात आठ दिवसांनी पाणी येत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पाणीपुरवठा आठवड्यातून एकदाच होत असताना नागरिकांकडून वर्षभराची पाणीपट्टी नियमित वसूल केली जाते. “३६५ दिवसांचे बिल भरायचे, पण पाणी मिळते फक्त ५२ दिवस,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. कर नियमित भरूनही मूलभूत सेवेत सातत्य नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

पाणी साठवण्यासाठी आवश्यक टाक्यांची कमतरता असल्याचे कारण प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र मागील काही वर्षांत शहराची लोकसंख्या अचानक वाढलेली नसताना पुरवठ्यात एवढी तफावत का निर्माण झाली, असा सवाल उपस्थित होत आहे.

नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर, नगरसेवक व आमदारांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालून नियमित पाणीपुरवठ्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जुळे सोलापूरमधील नागरिकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येत आहे.

शहरातील वाढत्या पाणीसमस्येमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाने तात्काळ नियोजन करून नियमित आणि न्याय्य पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!