महाड चवदार तळे सुशोभीकरणाला ५५ कोटींची मान्यता; २० मार्चला भूमिपूजनाचा शुभारंभ

महाड चवदार तळे सुशोभीकरणाला ५५ कोटींची मान्यता; २० मार्चला भूमिपूजनाचा शुभारंभ
महाड (जि. रायगड) :- चवदार तळे येथील ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रहच्या ९९ व्या वर्धापन दिनानिमित्त २० मार्च २०२६ रोजी शासनस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याच दिवशी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी तब्बल ५५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत वर्धापन दिन सोहळा आणि भूमिपूजन कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच भाविक व पर्यटकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनिल वारे, सहसचिव सोमनाथ बागुल, सहायक आयुक्त सुनिल जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, तहसीलदार महेश शितोळे तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जनजागृती कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
*ऐतिहासिक पार्श्वभूमी*
२० मार्च १९२७ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे चवदार तळे सत्याग्रह पार पडला होता. सार्वजनिक पाणवठ्यावर सर्वांना समान हक्क मिळावा, या मूलभूत अधिकारासाठी झालेला हा लढा भारतीय सामाजिक इतिहासातील क्रांतिकारी टप्पा मानला जातो. या सत्याग्रहामुळे सामाजिक समतेच्या चळवळीला नवी दिशा मिळाली.
*५५ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प*
सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत तळ्याचे संवर्धन, परिसराचे सौंदर्यीकरण, ऐतिहासिक माहिती केंद्र, प्रदर्शनी गॅलरी, पथदर्शक सुविधा, प्रकाशयोजना, पादचारी मार्ग आणि पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाडचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित होणार असून, पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
*भव्य वर्धापन दिन सोहळा*
२० मार्च २०२६ रोजी राज्यभरातून हजारो अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी महाड येथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शासनस्तरावर आयोजित कार्यक्रमात अभिवादन, सांस्कृतिक सादरीकरणे, व्याख्याने आणि सामाजिक समतेचा संदेश देणारे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
चवदार तळ्याच्या ९९ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू होणारा हा विकासप्रकल्प केवळ स्मारक उभारणीपुरता मर्यादित न राहता, सामाजिक समतेचा आणि संविधानिक मूल्यांचा संदेश अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न ठरणार आहे.



