क्राईम

खोट्या HIV अहवालामुळे गर्भवती महिलेचा संसार उद्ध्वस्त, अनुदानासाठी खोटे रिपोर्ट? सोलापूरात संशय वाढला

दोषींवर गुन्हा दाखल न झाल्यास १ मे रोजी आत्मदहनाचा इशारा

खोट्या HIV अहवालामुळे गर्भवती महिलेचा संसार उद्ध्वस्त, अनुदानासाठी खोटे रिपोर्ट? सोलापूरात संशय वाढला

दोषींवर गुन्हा दाखल न झाल्यास १ मे रोजी आत्मदहनाचा इशारा

सोलापूर (प्रतिनिधी):- अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या शासकीय आयसीटीसी (ICTC) केंद्राने दिलेल्या कथित खोट्या HIV पॉझिटिव्ह अहवालामुळे एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे केवळ वैद्यकीय निष्काळजीपणाच नव्हे, तर सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावरही गंभीर परिणाम झाल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला प्रसूतीपूर्व तपासणीसाठी १६ ऑगस्ट २०२४ रोजी अकलूज येथील शासकीय रुग्णालयात गेली होती. त्यावेळी आयसीटीसी केंद्रात तिची HIV चाचणी करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल देण्यात आला. या अहवालावर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणि शिक्का देखील होता. या निष्कर्षावर आधारित महिलेला पुढील उपचारासाठी पंढरपूर येथील ART केंद्रात पाठवण्यात आले आणि तिच्यावर अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी सुरू करण्यात आली.

मात्र, या अहवालाबाबत शंका निर्माण झाल्याने संबंधित महिलेने विविध शासकीय केंद्रांमध्ये पुन्हा तपासण्या केल्या. जानेवारी २०२६ मध्ये इंदापूर, पंढरपूर तसेच खारघर येथील प्रगत प्रयोगशाळांमध्ये करण्यात आलेल्या HIV तपासण्यांचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले. विशेष म्हणजे PCR सारख्या अत्यंत अचूक चाचणीतही “HIV-1 RNA Not Detected” असा निष्कर्ष नोंदवण्यात आला. एप्रिल २०२६ मध्ये बारामती येथेही HIV चाचणी निगेटिव्ह आली.

या सर्व अहवालांमुळे अकलूज आयसीटीसी केंद्राने दिलेला पॉझिटिव्ह अहवाल चुकीचा आणि वैद्यकीयदृष्ट्या आधारहीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. तज्ञांच्या मते, गर्भावस्थेत हार्मोनल बदलांमुळे काही वेळा False Positive येऊ शकतो, मात्र अशा परिस्थितीत Confirmatory Test करणे आवश्यक असते. संबंधित केंद्राने ही प्रक्रिया न पाळल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या चुकीच्या अहवालाचे गंभीर सामाजिक परिणामही समोर आले. पती आणि सासरच्या मंडळींनी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला घराबाहेर काढले. त्यामुळे ती आपल्या लहान मुलासह माहेरी राहण्यास भाग पडली. यामुळे तिच्यावर मानसिक, सामाजिक आणि आर्थिक संकट कोसळले. तसेच अनावश्यक औषधोपचारामुळे तिच्या आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यावरही धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, या प्रकरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील आयसीटीसी केंद्रांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णसंख्या वाढवून अनुदान मिळवण्यासाठी काही केंद्रांकडून खोटे HIV पॉझिटिव्ह अहवाल दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांतील सर्व अहवाल आणि अनुदानाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणातील संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही पुढे आली आहे. तसेच पीडित महिलेला नुकसानभरपाई देऊन तिचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, न्याय न मिळाल्यास संबंधित पीडिता १ मे २०२६ रोजी आपल्या बाळासह मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!