सोलापूर

शाळांचा दर्जा सुधारा, आरोग्य सेवा सक्षम करा! मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

यावली शाळेचा दर्जा ‘क’ किंवा ‘ब’ वर्गापर्यंत उंचावण्याचे उद्दिष्ट; अनगर आरोग्य केंद्राची पाहणी, चिंचोली काटी येथे घरकुल लाभार्थ्याची घेतली भेट

शाळांचा दर्जा सुधारा, आरोग्य सेवा सक्षम करा! मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

यावली शाळेचा दर्जा ‘क’ किंवा ‘ब’ वर्गापर्यंत उंचावण्याचे उद्दिष्ट; अनगर आरोग्य केंद्राची पाहणी, चिंचोली काटी येथे घरकुल लाभार्थ्याची घेतली भेट

मोहोळ : जिल्हा परिषदेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासोबतच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करणे आणि शासकीय घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० च्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोहोळ तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात शाळेचा दर्जा सुधारण्यापासून आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेपर्यंत आणि घरकुल लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांपर्यंत विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

दौऱ्याची सुरुवात यावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भेटीने झाली. सध्या ‘ड’ वर्गात असलेल्या या शाळेचा दर्जा उंचावून ‘क’ किंवा ‘ब’ वर्गात समावेश करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी शिक्षकांशी सविस्तर चर्चा केली. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची प्रगती आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

शाळेच्या पाहणीदरम्यान जैन यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या ग्रुप ॲक्टिव्हिटी, विविध शैक्षणिक उपक्रम आणि अध्ययन-अध्यापन पद्धतींची माहिती घेतली. केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि कृतीतून शिकण्याची आवड निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शिक्षकांनी नियोजनबद्ध प्रयत्न करून शाळेच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल घडवून आणावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

यानंतर अनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ऑपरेशन थिएटर, औषधसाठा, प्रयोगशाळेतील तपासणी सुविधा आणि आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करण्यात आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन कामकाज, उपलब्ध मनुष्यबळ, आरोग्य सुविधा आणि कामकाजातील अडचणींची माहिती जाणून घेतली. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.

दौऱ्याच्या पुढील टप्प्यात चिंचोली काटी येथे घरकुल योजनेच्या लाभार्थ्याच्या निवासस्थानी जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सदिच्छा भेट दिली. घरकुल बांधकामाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा आणि शासकीय योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे की नाही, याची त्यांनी पाहणी केली. घरकुल योजनांची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न राहता लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला पाहिजे, या दृष्टीने त्यांनी माहिती घेतली.

या दौऱ्यातून ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य आणि निवास या मूलभूत सुविधांच्या गुणवत्तावाढीवर जिल्हा परिषद प्रशासनाचा भर असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी मोहोळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तेजश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक आणि विस्तार अधिकारी नागसेन कांबळे उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!