राजकारण

हन्नूरमध्ये प्रशासन-लोकप्रतिनिधींचा विकास संवाद; चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सहविचार सभा

जि.प. सदस्या शांभवी कल्याणशेट्टी यांच्या पुढाकारातून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह ग्रामविकासाचा आढावा; अडचणींवर तत्काळ उपाययोजनांवर भर

हन्नूरमध्ये प्रशासन-लोकप्रतिनिधींचा विकास संवाद; चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सहविचार सभा

जि.प. सदस्या शांभवी कल्याणशेट्टी यांच्या पुढाकारातून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह ग्रामविकासाचा आढावा; अडचणींवर तत्काळ उपाययोजनांवर भर

चपळगाव : ग्रामीण भागात सुशासनाची संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने चपळगाव जिल्हा परिषद गटातील १८ गावांसाठी हन्नूर येथे लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त सहविचार सभा उत्साहात पार पडली. जिल्हा परिषद सदस्या शांभवी कल्याणशेट्टी, पंचायत समिती सभापती रश्मी हिप्परगी आणि उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांच्या संकल्पनेतून आयोजित या बैठकीत गावागावातील विकासकामांचा आढावा घेत भविष्यातील विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

प्रत्येक गाव स्मार्ट आणि विकासाभिमुख बनावे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, तसेच विकासकामांमधील अडथळे दूर व्हावेत या उद्देशाने या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला १८ गावांतील प्रशासक, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद शाळांचे प्रतिनिधी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील अधिकारी, आशा वर्कर्स तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जि.प. सदस्या शांभवी कल्याणशेट्टी यांनी सभेचा उद्देश स्पष्ट करताना, प्रत्येक गावातील प्रश्न समजून घेऊन त्यावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी संयुक्तपणे काम केल्यास विकासकामांना निश्चितच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

 

बैठकीला पंचायत समिती सभापती रश्मी हिप्परगी, उपसभापती सागर कल्याणशेट्टी, पंचायत समिती सदस्य विनोद मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सहाय्यक गटविकास अधिकारी अमोल मुंडे, उपअभियंता एम. एस. उंबरजे, बाल विकास अधिकारी भोसले, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व्ही. डी. राठोड, गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, विनायक तवटे, डी. जी. कवडे, आरोग्य अधिकारी अश्विन करजखेडे, वित्त विभागाचे एस. होणसुरे, उमेदचे केशवदास, स्वच्छ भारत मिशनचे सतीश शिंगे, प्रियंका संगमनेरकर, कार्यक्रम अधिकारी पूनम मुळे, प्रशासक सरपंच सोनाली तळवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी चपळगाव, हन्नूर, बऱ्हाणपूर, बावकरवाडी, चपळगाववाडी, डोंबरजवळगे, कुरनूर, सिंदखेड, मोट्याळ, किणी, काझीकणबस, किणीवाडी, सुलतानपूर, बोरेगाव, दर्शनाळ, पितापूर, नन्हेगाव, अरळी आणि चुंगी या गावांतील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या गावांतील पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, अंगणवाडी, ग्रामविकास आणि शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील प्रश्न मांडले. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नांवर मार्गदर्शन करत आवश्यक त्या ठिकाणी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीदरम्यान ग्रामविकासासाठी आवश्यक असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. गावनिहाय विकास आराखडे, शासकीय निधीचा प्रभावी वापर, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, स्वच्छ भारत अभियान आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

या उपक्रमामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत झाला असून, विविध विभागांचे अधिकारी एकाच व्यासपीठावर आल्याने अनेक प्रश्नांवर तातडीने चर्चा होऊन त्यावर उपाययोजनांची दिशा निश्चित करण्यात आली. त्यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

हन्नूर येथे आयोजित लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहविचार सभेमुळे चपळगाव गटातील विविध विकासकामे आणि समस्यांवर सखोल चर्चा झाली. सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकाच ठिकाणी उपस्थित राहिल्याने अनेक प्रश्नांवर त्वरित निर्णय घेण्यास मदत झाली आणि वेळेचीही बचत झाली. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, याच धर्तीवर तालुक्यातील इतर गावांमध्येही अशा सहविचार सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समिती सभापती सागर कल्याणशेट्टी यांनी दिली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!