सिमेंट रस्त्याच्या संथ कामाचा फटका; आसरा चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा
पीक अवरमध्ये वाहतूक विस्कळीत; नोकरदार, विद्यार्थी आणि नागरिकांचा खोळंबा

सिमेंट रस्त्याच्या संथ कामाचा फटका; आसरा चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा
पीक अवरमध्ये वाहतूक विस्कळीत; नोकरदार, विद्यार्थी आणि नागरिकांचा खोळंबा
सोलापूर : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या होटगी रोडवरील आसरा चौक परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे गुरुवारी सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली. कामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाल्याने आणि काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आल्याने सकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

आसरा चौक हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो दुचाकी, चारचाकी, बस आणि मालवाहू वाहने प्रवास करतात. मात्र सध्या सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी झाली आहे. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावून चौकात मोठी कोंडी निर्माण होत आहे.
गुरुवारी सकाळी कार्यालयीन वेळेत वाहनांची संख्या वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. अनेक वाहनचालकांना चौक ओलांडण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा शेकडो मीटरपर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसून आले. या कोंडीचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवरही झाला.

स्थानिक नागरिकांनी रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तसेच काम सुरू असताना वाहतुकीचे योग्य नियोजन, पर्यायी मार्गांची स्पष्ट माहिती आणि आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली विकासकामे आवश्यक असली तरी ती वेळेत पूर्ण करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी अपेक्षा वाहनचालक आणि परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.




