लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर जिल्हा परिषद सज्ज; पर्यावरणपूरक वारीवरही विशेष भर
अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालखी मार्गाची पाहणी करून कामांना दिली गती

लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर जिल्हा परिषद सज्ज; पर्यावरणपूरक वारीवरही विशेष भर
अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालखी मार्गाची पाहणी करून कामांना दिली गती
सोलापूर : आषाढी वारी २०२६ निमित्त लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने तयारीला अंतिम स्वरूप दिले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली पालखी मार्ग, मुक्काम तळे आणि रिंगण स्थळांचा संयुक्त पाहणी दौरा पार पडला.

या दौऱ्यात शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे यांनीही प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन विविध कामांचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, कार्यकारी अभियंता एस. व्ही. कुलकर्णी, माळशिरसचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, जिल्हा परिषद सदस्य धनाजी जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.
सकाळी धर्मपुरी येथून पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. धर्मपुरी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा तळ, पुरदावडे आणि खुडूस येथील प्रसिद्ध गोल रिंगण स्थळ तसेच पुरदावडे प्राथमिक आरोग्य केंद्राची सविस्तर पाहणी करण्यात आली. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि आवश्यक सेवा वेळेत मिळाव्यात यासाठी अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

वेळापूर येथील पालखी मुक्काम तळावर उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक जर्मन हँगर, तात्पुरती शौचालये आणि स्नानगृहांच्या कामाची पाहणी करून दर्जाबाबत तपासणी करण्यात आली. त्यानंतर बोंडले येथील श्री चांगा वटेश्वर महाराज पालखी तळ तसेच बोरगाव आणि पिराची कुरोली येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम स्थळांचा आढावा घेण्यात आला.
वारी काळात लाखो भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी उभारण्यात आलेल्या पाणी टँकर फीडिंग पॉइंट्सची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाणीपुरवठ्याचे नियोजन, टँकरची उपलब्धता आणि वितरण व्यवस्थेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

भंडीशेगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी तळ तसेच पंढरपूरजवळील वाखरी येथील भव्य गोल रिंगण सोहळा स्थळाची पाहणी करून आषाढी वारीच्या अंतिम तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी केवळ मूलभूत सुविधांवर भर न देता ‘पर्यावरणपूरक वारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि उपस्थित पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या हस्ते विविध पालखी तळांवर वृक्षारोपण करण्यात आले. पालखी मार्ग हिरवागार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
या संयुक्त पाहणी दौऱ्यानंतर पालखी मार्गावरील विविध विकासकामांना अधिक वेग मिळाला असून, आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांचे स्वागत करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद सर्व यंत्रणांसह पूर्णपणे सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.



