पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव; शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपची उमेदवारी
महायुतीच्या जागावाटपानंतर भाजपकडून दोन्ही उमेदवार जाहीर; शिवसेनेचे मंगेश चिवटे फॉर्म भरण्यावर ठाम

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव; शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपची उमेदवारी
महायुतीच्या जागावाटपानंतर भाजपकडून दोन्ही उमेदवार जाहीर; शिवसेनेचे मंगेश चिवटे फॉर्म भरण्यावर ठाम
पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे राजकीय चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. (श्रीमती) स्मिता योगेश जाधव, तर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत भाजपने शिक्षण क्षेत्राशी संबंधित चेहऱ्यांना संधी देत आपली रणनीती स्पष्ट केली आहे.
भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून ४ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या नावांचा समावेश आहे.

• पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव यांना संधी •
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी देत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे. डॉ. स्मिता जाधव या प्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या कन्या आहेत. तसेच त्या दैनिक ‘पुढारी’चे समूह संपादक व चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या पत्नी आहेत.
शिक्षण क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्या पिंपरी-चिंचवड येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू म्हणून कार्यरत असून, डी. वाय. विद्यापीठ सोसायटीच्या विश्वस्त सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्राशी असलेली त्यांची नाळ आणि संस्थात्मक कामाचा अनुभव हा त्यांच्या उमेदवारीतील महत्त्वाचा मुद्दा मानला जात आहे.
महायुतीमधील जागावाटपाच्या चर्चेनंतर पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आणि पक्षाने डॉ. स्मिता जाधव यांचे नाव पुढे करत या मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीची मोठी चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

• शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे •
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी दिली आहे. कोल्हापूर येथील प्रतिष्ठित श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून ते कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रशासनाचा अनुभव तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी असलेला संपर्क ही त्यांची प्रमुख जमेची बाजू मानली जात आहे.
शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर काम करताना त्यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांशी संपर्क ठेवला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. जुनी पेन्शन योजना, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्या हे त्यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दे राहण्याची शक्यता आहे.
केवळ आश्वासनांवर न थांबता ठोस भूमिका आणि जाहीरनाम्याच्या माध्यमातून शिक्षकांसमोर जाण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या या उमेदवारीकडे विशेष लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक आणि करमाळ्याचे मंगेश चिवटे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. मात्र, अंतिम उमेदवारी भाजपकडे गेल्याने शेवते यांचा पत्ता कट झाला आहे.
तरीही मंगेश चिवटे निवडणुकीतून माघार घेण्याच्या मनःस्थितीत नसून, आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधातच महायुतीतील घटक पक्षाच्या समर्थक नेत्याने अर्ज दाखल केल्यास शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरण अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे.
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्न, रोजगार, शैक्षणिक धोरणे, शिक्षकांच्या सेवा अटी, जुनी पेन्शन योजना तसेच पदवीधरांच्या विविध समस्या हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे ठरण्याची शक्यता आहे.
भाजपने पदवीधरांसाठी शिक्षण क्षेत्रातील अनुभवी चेहरा आणि शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षण संस्थेतील प्रशासकीय अनुभव असलेला चेहरा पुढे केल्याने पक्षाने आपली निवडणूक रणनीती स्पष्ट केली आहे. मात्र, विरोधक कोणाला मैदानात उतरवतात आणि मंगेश चिवटे यांची पुढील भूमिका काय राहते, यावर पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.



