राजकारण

‘शिवरत्न’च्या नामांतरावर पालकमंत्री गोरेंची स्पष्ट भूमिका; म्हणाले, ‘मोहिते पाटलांचं नाव कुठे पुसलं?’

‘सगळ्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या नावाचं कम्पल्शन कशासाठी?’; बहुमताच्या निर्णयावरून राजकारण नको, जयकुमार गोरेंचा इशारा

‘शिवरत्न’च्या नामांतरावर पालकमंत्री गोरेंची स्पष्ट भूमिका; म्हणाले, ‘मोहिते पाटलांचं नाव कुठे पुसलं?’

‘सगळ्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या नावाचं कम्पल्शन कशासाठी?’; बहुमताच्या निर्णयावरून राजकारण नको, जयकुमार गोरेंचा इशारा

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील ‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव बदलून ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह’ करण्याच्या सत्ताधारी भाजपच्या निर्णयावरून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे. या नामांतराच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नामांतराचा निर्णय हा जिल्हा परिषदेतील सदस्यांनी बहुमताने घेतला असल्याने त्याचा लोकशाही प्रक्रियेनुसार स्वीकार केला पाहिजे, असे गोरे यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या वक्तव्यामुळे या वादाला आणखी एक राजकीय आयाम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषदेतील सभागृहाच्या नावाचा विषय सदस्यांसमोर आला आणि सदस्यांनी बहुमताने निर्णय घेतला. त्यामुळे या निर्णयाचे राजकारण करण्याची आवश्यकता नसल्याचे जयकुमार गोरे म्हणाले.

“लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. सदस्यांनी बहुमताने निर्णय घेतला असेल तर तो स्वीकारला पाहिजे. सोलापूर जिल्ह्यासमोर अनेक मोठे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी नामांतराच्या विषयाचे राजकारण करण्याची गरज नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

या संपूर्ण वादात शंकरराव मोहिते पाटील यांच्या नावाचा संदर्भ दिला जात असल्यावर गोरे यांनी थेट सवाल उपस्थित केला.

 

“शंकरराव मोहिते पाटील यांचे नाव कसे पुसले जाईल? मोहिते पाटलांचे नाव प्रत्येक गल्लीला, बोळाला, रस्त्याला आहे. कुठल्या ठिकाणी त्यांचे नाव नाही? एवढ्या सगळ्या ठिकाणी त्यांचे नाव असताना प्रत्येक ठिकाणी त्याच नावाचे कम्पल्शन कशासाठी पाहिजे?” असा सवाल त्यांनी केला.

मात्र, शंकरराव मोहिते पाटील यांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचेही गोरे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या योगदानाचा अनादर करण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी सांगितले.

नामांतराबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण देताना गोरे म्हणाले की, शंकरराव मोहिते पाटील यांचे नाव बदलण्यात आलेले नाही आणि ते बदलण्याचा प्रश्नही नाही.

“आम्ही शंकरराव मोहिते पाटील यांचे नाव बदललेले नाही. आम्ही ते बदलणारही नाही. ‘शिवरत्न’ हे नाव बदलण्यात आले आहे. हा निर्णय मी घेतलेला नाही. जिल्हा परिषदेच्या सभागृहातील सदस्यांनी बहुमताने हा निर्णय घेतल्याचे मला तुमच्या माध्यमातून समजले आहे,” असे त्यांनी सांगितले.

त्यामुळे ‘शिवरत्न’चे नामांतर म्हणजे शंकरराव मोहिते पाटील यांच्या नावाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी अप्रत्यक्षपणे फेटाळून लावला.

‘शिवरत्न’ हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी जोडले जात असल्याने या निर्णयावरून वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. यावरही गोरे यांनी भाष्य केले.

“आता कुठलेही नाव जोडणे संयुक्तिक नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सन्मान करतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, याचवेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थानावर प्रश्न उपस्थित केला.

• ‘महाराजांचा पुतळा दर्शनी भागात असायला हवा होता’ •

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जिल्हा परिषदेच्या पाठीमागील बाजूस असल्याकडे लक्ष वेधत गोरे म्हणाले की, महाराजांचा पुतळा पाठीमागे बसविणे योग्य नव्हते. तो जिल्हा परिषदेच्या दर्शनी आणि पुढील भागात असायला हवा होता.

या वक्तव्यामुळे नामांतराच्या वादासोबतच जिल्हा परिषदेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थानाचा मुद्दाही चर्चेत येण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे गोरे यांनी ठामपणे सांगितले.

“छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. महाराजांच्या नावाला काळिमा लागेल, असे कोणतेही कृत्य आम्ही करणार नाही आणि कुणालाही करू देणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.

त्याचवेळी ‘शिवरत्न’ सभागृहाचे नामांतर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान हे दोन स्वतंत्र विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे जिल्हा परिषदेतील भाजपने ‘शिवरत्न’ सभागृहाचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे या निर्णयाला शंकरराव मोहिते पाटील यांच्या नावाशी जोडले जात आहे. त्यातच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी “सगळ्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या नावाचं कम्पल्शन कशासाठी?” असा थेट सवाल केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

बहुमताने घेतलेला निर्णय स्वीकारण्याचे आवाहन करतानाच गोरेंनी शंकरराव मोहिते पाटील यांच्या नावाचा सन्मान कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोच्च असल्याचे सांगून नामांतराचा विषय आणि महाराजांचा सन्मान हे वेगळे विषय असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

आता पालकमंत्र्यांच्या या भूमिकेवर विरोधक तसेच मोहिते पाटील समर्थकांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!