अकलूजमध्ये भाजपचे शक्तिप्रदर्शन! तिरंगा बाइक रॅलीला हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम सातपुते व जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या उपस्थितीत ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अकलूजमध्ये भाजपचे शक्तिप्रदर्शन! तिरंगा बाइक रॅलीला हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम सातपुते व जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या उपस्थितीत ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अकलूज : ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूज शहरात भव्य तिरंगा बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात राष्ट्रध्वज आणि ओठांवर देशभक्तीच्या घोषणा घेऊन हजारो कार्यकर्ते व नागरिक या रॅलीत सहभागी झाल्याने संपूर्ण अकलूज शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली पार पडली. रॅलीतील मोठ्या संख्येने झालेला कार्यकर्त्यांचा सहभाग हा भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन ठरल्याची चर्चा यावेळी पाहायला मिळाली.

अकलूज येथील मध्यवर्ती विजय चौकातून रॅलीला सुरुवात झाली. दुचाकींवर तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झालेले कार्यकर्ते शिस्तबद्ध पद्धतीने शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
रॅली गांधी चौक, सदाभाऊ चौक, महर्षी चौक, प्रतापसिंह चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने बस स्थानक, जुने पोलीस स्टेशन, शिवापूर पेठ, मारुती मंदिर, नगरपरिषद आणि शिवसृष्टी किल्ला या प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. त्यानंतर रॅली पुन्हा विजय चौकात पोहोचली आणि उत्साहात सांगता करण्यात आली.

रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी सहभागी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. विशेषतः युवकांचा मोठा सहभाग लक्षवेधी ठरला. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या दुचाकींवर तिरंगा ध्वज लावून देशभक्तीचा संदेश दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ‘हर घर तिरंगा’ अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन केले. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घराघरात पोहोचविण्याचे आवाहनही करण्यात आले.
अकलूजमध्ये झालेल्या या भव्य तिरंगा रॅलीमुळे शहरात दिवसभर देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलेली रॅली यामुळे भाजपने अकलूजमध्ये संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडविल्याचे चित्र निर्माण झाले.



