राजकारण

दुधनी बाजार समितीसमोर म्हेत्रे समर्थकांचे सहा तास ठिय्या आंदोलन; ७ दिवसांत गणेश मूर्ती हटविण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन

स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या चबुतऱ्यावरील वाद तापला; कारवाई न झाल्यास बाजार समितीला टाळे ठोकण्याचा शिवसेना नेते शंकर म्हेत्रे यांचा इशारा

दुधनी बाजार समितीसमोर म्हेत्रे समर्थकांचे सहा तास ठिय्या आंदोलन; ७ दिवसांत गणेश मूर्ती हटविण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन

स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या चबुतऱ्यावरील वाद तापला; कारवाई न झाल्यास बाजार समितीला टाळे ठोकण्याचा शिवसेना नेते शंकर म्हेत्रे यांचा इशारा

अक्कलकोट (प्रतिनिधी) : स्वर्गीय लोकनेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेला चबुतरा बेकायदेशीरपणे पाडून त्या जागेवर गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आल्याच्या निषेधार्थ म्हेत्रे समर्थकांनी बुधवारी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर तीव्र ठिय्या आंदोलन छेडले. दुपारी १२.२० वाजता सुरू झालेले हे आंदोलन तब्बल सहा तास चालले. अखेर प्रशासनाने संबंधित जागेवरील गणेश मूर्ती व उभारण्यात आलेले बांधकाम येत्या सात दिवसांत हटविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

आंदोलनानंतर शिवसेना नेते शंकर म्हेत्रे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, दिलेल्या मुदतीत कारवाई झाली नाही आणि संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत, तर दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळे ठोकण्यात येईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस प्रशासनच जबाबदार राहील.

माहितीनुसार, बाजार समितीच्या कार्यालयाशेजारी स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने चबुतरा उभारला होता. या कामाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र, पंचवार्षिक निवडणुकीनंतर बाजार समितीवरील सत्ता बदलल्यानंतर विद्यमान संचालक मंडळाने हा चबुतरा पाडल्याचा आरोप म्हेत्रे समर्थकांनी केला आहे. त्याच ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना करून मंदिर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे हा वाद अधिकच चिघळला.

या प्रकरणी बाजार समितीचे सचिव, सभापती, उपसभापती तसेच संबंधित संघटनेच्या अध्यक्षांविरुद्ध ३० जूनपर्यंत गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हेत्रे समर्थकांनी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. कारवाई न झाल्यास १ जुलै रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर समर्थकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले.

या आंदोलनात सुमारे ५०० हून अधिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सहा पोलीस अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी तसेच आरसीपी पथकाचे २० जवान आंदोलनस्थळी तैनात करण्यात आले होते.

आंदोलनस्थळी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर, सहाय्यक निबंधक राहुल ठोंबरे, सहाय्यक सहकारी अधिकारी अनिल मदने तसेच सहकारी अधिकारी (श्रेणी-२) एस. व्ही. कुंभार यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. अखेरीस सात दिवसांत आवश्यक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर म्हेत्रे, नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, नगरसेवक बसवराज हौदे, माजी सभापती आनंदराव सोनकांबळे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे, पंचायत समिती सदस्य गणेश मोरे, बाजार समिती संचालक शिवानंद पाटील, संचालक इरण्णा धसाडे, सातलिंगप्पा परमशेट्टी, रोप निंबाळकर, बसवराज परमशेट्टी, संगमेश सिन्नर, विश्वनाथ म्हेत्रे, बाबू कोळी, चंद्रकांत यगदी, सिद्धाराम यगदी, अशोक ढंगापुरे, पंचायत समिती सदस्य भीमण्णा सोलापुरे, रामा गद्दी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

चौकट : शंकर म्हेत्रे यांचा इशारा

“स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पुतळ्यासाठी उभारलेला चबुतरा बेकायदेशीरपणे पाडून त्या ठिकाणी मंदिर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत आम्ही उपनिबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार देऊन संबंधितांवर ३० जूनपर्यंत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागले. आता प्रशासनाने सात दिवसांत गणेश मूर्ती व संबंधित बांधकाम हटविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. जर या मुदतीत कारवाई झाली नाही, तर दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णपणे बंद पाडण्यात येईल,” असा इशारा शिवसेना नेते शंकर म्हेत्रे यांनी दिला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!