शिंदेंच्या विश्वासू शिलेदाराची शिक्षक मतदारसंघात तयारी; ६ सप्टेंबरला प्रचाराचा नारळ फुटणार
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याचे चिवटेंचे वक्तव्य; ६ सप्टेंबरला शिक्षक मेळाव्यात प्रचाराचा शुभारंभ
शिंदेंच्या विश्वासू शिलेदाराची शिक्षक मतदारसंघात तयारी; ६ सप्टेंबरला प्रचाराचा नारळ फुटणार
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याचे चिवटेंचे वक्तव्य; ६ सप्टेंबरला शिक्षक मेळाव्यात प्रचाराचा शुभारंभ
पुणे : पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी म्हणून काम पाहिलेले मंगेश चिवटे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत आपल्या उमेदवारीची माहिती देताना सांगितले की, येत्या ६ सप्टेंबर रोजी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याच मेळाव्यात त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महायुतीतील खासदार, मंत्री आणि आमदारांची उपस्थिती या मेळाव्याला राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
आपल्याला पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे चिवटे यांनी सांगितले. या नेत्यांनी आपल्या उमेदवारीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.
त्यामुळे आगामी काळात महायुतीकडून चिवटे यांच्या उमेदवारीला अधिकृत पाठिंबा मिळतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या मात्र त्यांच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय अधिकृतपणे जाहीर झालेला नसल्याचे चित्र आहे.
• शिक्षक संघटनेचा पाठिंबा •
दरम्यान, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेने मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ यांनी चिवटे यांची उमेदवारी जाहीर केल्याचे सांगितले.
या संघटनेचे राज्यात सुमारे २३ हजार शिक्षक सदस्य असून, त्यापैकी सुमारे १५ हजार सदस्य पुणे शिक्षक मतदारसंघात असल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या संघटनेचा पाठिंबा चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच मतदारांशी संपर्क आणि संघटनात्मक बांधणीला सुरुवात झाली आहे.
नुकतेच महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीकडून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता मंगेश चिवटे यांनीही मैदानात उतरण्याची घोषणा केल्याने पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.
• कोल्हापुरात पुरस्कार सोहळा •
रविवारी कोल्हापूर येथे आदर्श शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघातील संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाकडेही राजकीयदृष्ट्या पाहिले जात आहे.



