बोरामणी नाका पुन्हा रक्तरंजित! ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
वारंवारच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप; जड वाहनांवर दिवसा बंदीची मागणी पुन्हा ऐरणीवर

बोरामणी नाका पुन्हा रक्तरंजित! ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
वारंवारच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप; जड वाहनांवर दिवसा बंदीची मागणी पुन्हा ऐरणीवर
सोलापूर (प्रतिनिधी) :
सोलापूर शहरातील बोरामणी नाका हा अपघातप्रवण ठरत असताना गुरुवारी आणखी एका भीषण अपघाताने एका व्यक्तीचा बळी घेतला. भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

माहितीनुसार, टीएन-52-एडी-3432 क्रमांकाचा ट्रक आणि एमएच-12-सीई-8797 क्रमांकाची दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. मात्र, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत करण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण आणि ट्रकचालकाची जबाबदारी याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, बोरामणी नाका परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या मार्गावर मोठ्या आणि अवजड वाहनांची दिवसभर सुरू असलेली वाहतूक अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे दिवसा जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी, स्वतंत्र वाहतूक नियोजन, वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी, तसेच सीसीटीव्ही आणि वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा अशा दुर्घटना रोखणे कठीण होईल, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.



