देश - विदेश

शासकीय सन्मानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप; विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात उसळला जनसागर

शासकीय सन्मानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप; विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात उसळला जनसागर

बारामती (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर नेतृत्व, स्पष्ट भूमिका आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांना राज्य शासनातर्फे शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार विधी पार पडला. यापूर्वी अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. यावेळी “अजित दादा परत या”, “अजित दादा अमर रहें” अशा भावनिक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची असंख्य गर्दी जमली होती. सर्वसामान्य जनतेपासून ते वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सर्व स्तरांतील लोक उपस्थित होते.

अंत्यसंस्कार प्रसंगी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह राज्यातील व देशातील विविध पक्षांचे नेते, खासदार, आमदार आणि मान्यवर उपस्थित होते.

Oplus_16908288

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून शोकसंवेदना व्यक्त केल्या. अंत्यसंस्कार विधी दरम्यान पोलीस दलातर्फे बंदुकीच्या सलामीद्वारे मानवंदना देण्यात आली.

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार व जय पवार यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. संपूर्ण अंत्यसंस्कार विधी शासकीय प्रोटोकॉलनुसार शांततेत व सन्मानपूर्वक पार पडला.

अजित पवार हे शिस्तप्रिय, निर्णयक्षम आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक व राजकीय जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात उसळलेला जनसागर हेच दर्शवत होता की अजित पवार हे केवळ लोकप्रतिनिधी नव्हते, तर महाराष्ट्राच्या जनमानसातील लाडके ‘दादा’ होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!