सोलापूर जिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; भिमगीतांनी सभागृह दणाणले
कास्ट्राईब संघटनेतर्फे मिठाई वाटप; सामाजिक समतेचा संदेश
सोलापूर जिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; भिमगीतांनी सभागृह दणाणले
कास्ट्राईब संघटनेतर्फे मिठाई वाटप; सामाजिक समतेचा संदेश
सोलापूर,(प्रतिनिधी):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेत समाज कल्याण विभाग आणि कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भिमगीतांच्या गजरात यशवंतराव चव्हाण सभागृह सामाजिक जागृतीच्या भावनेने भारून गेले.

कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद आवारातील संविधान कोनशिलेस अभिवादनाने झाली. यावेळी अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण सभापती अॅड. अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर मराठी सेवा संघाच्या पुढाकारातून पक्ष्यांसाठी पाण्याच्या सुविधेचा शुभारंभ करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविण्यात आले.

यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. भिम शाहिर संदिप शिंदे प्रबोधन मंच, सोलापूर आणि प्रा. जीवन संदिप शिंदे यांच्या पथकाने सादर केलेल्या भिमगीतांनी उपस्थितांना प्रेरित केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून समतेचा संदेश दिला.
प्रबोधनपर सत्रात पुणे येथील व्याख्याते निलेश विमल धायरकर यांनी “राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांची माहिती देताना देशाच्या एकात्मतेसाठी मध्यवर्ती राजधानीची संकल्पना, भाषावाद टाळण्याची भूमिका आणि आर्थिक विचार मांडले.

या कार्यक्रमात समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा तसेच आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मान्यवरांच्या भाषणातही बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी डॉ. आंबेडकरांचे योगदान सर्व क्षेत्रात असल्याचे सांगत त्यांना एका समाजापुरते मर्यादित करण्याची प्रवृत्ती चुकीची असल्याचे नमूद केले. महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यात त्यांचे ऐतिहासिक योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आणि विकसित भारतासाठी त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले.
अध्यक्ष दिपक वैद्य यांनी “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” या बाबासाहेबांच्या विचाराचा उल्लेख करत शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. जिल्हा परिषद सर्व घटकांपर्यंत पोहोचून विकास घडविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी हिंदू कोड बिलाद्वारे महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाचा उल्लेख केला. जगात रक्तरंजित क्रांती घडल्या असल्या तरी भारतात अहिंसक मार्गाने परिवर्तन घडवण्यात बाबासाहेबांचे योगदान मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला व बालकल्याण सभापती अॅड. अमृता वाघे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने मिठाई वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाध्यक्ष अरुण क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उमाकांत राजगुरू, योगेश कटकधोंड, शंकर चलवादी व धन्यकुमार राठोड यांनी उपस्थितांना मिठाईचे वाटप केले. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमास प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, कार्यकारी अभियंते संतोष कुलकर्णी व नरेंद्र खराडे, शिक्षणाधिकारी कादर शेख, लिपिक संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, गिरीष जाधव, सचिन जाधव, रणजित घोडके, अभिमन्यु कांबळे, मनोज म्हेत्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद मिरकले यांनी केले. सूत्रसंचालन सुहास गुरव यांनी केले, तर आभार कल्याण श्रावस्ती यांनी मानले.



