“जिल्हा परिषद समोरील ‘बगीचा’ ठरला मनीषा आव्हाळे यांच्या कामाचा जिवंत ठसा; ग्रामीण जनतेसाठी दिलासा देणारा निर्णय”
“उन्हात थांबणाऱ्या ग्रामस्थांना ‘बगीचा’मुळे मिळाला सावलीचा दिलासा”
“जिल्हा परिषद समोरील ‘बगीचा’ ठरला मनीषा आव्हाळे यांच्या कामाचा जिवंत ठसा; ग्रामीण जनतेसाठी दिलासा देणारा निर्णय”
“उन्हात थांबणाऱ्या ग्रामस्थांना ‘बगीचा’मुळे मिळाला सावलीचा दिलासा”
सोलापूर :- सोलापूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कारकीर्दीला आजही नागरिकांकडून मोठ्या आदराने आठवले जात आहे. ऑगस्ट २०२३ ते ऑगस्ट २०२४ या एका वर्षाच्या कालावधीत त्यांनी ग्रामीण विकासासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी घेतलेले निर्णय विशेष ठरले. यामध्ये जिल्हा परिषद मुख्यालयासमोरील “बगीचा” हा त्यांच्या कार्याचा जिवंत आणि लोकाभिमुख नमुना ठरला आहे.

पूर्वी जिल्हा परिषद कार्यालयासमोरील बगीचा पूर्णतः बंदिस्त होता. चारी बाजूंनी कंपाऊंड असल्यामुळे ना नागरिकांना बसण्याची सोय होती, ना त्या जागेचा उपयोग होत होता. मात्र मनीषा आव्हाळे यांनी या बगीच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी कंपाऊंडचा काही भाग कमी करून त्या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था केली आणि उर्वरित जागा नागरिकांसाठी खुली करून सुंदर बगीचा विकसित केला.
आज हा बगीचा ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक ठिकाण ठरला आहे. अनेक नागरिक कामासाठी जिल्हा परिषदेत येतात, परंतु कामात विलंब झाल्यास किंवा प्रतीक्षा करावी लागल्यास हा बगीचा त्यांना सावलीत बसण्याची सोय उपलब्ध करून देतो. विशेषतः उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत हा बगीचा म्हणजे जणू शांततेचा आणि विश्रांतीचा आधार बनला आहे.

नागरिकांच्या भावना व्यक्त करताना अनेकजण सांगतात की, “जर मनीषा आव्हाळे यांनी हा बगीचा खुला केला नसता, तर आम्हाला उन्हात उभे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. आज आम्ही निवांतपणे इथे बसू शकतो.”
याशिवाय त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण आरोग्य सेवांना चालना देण्यासाठी Breast Cancer तपासणी व्हॅन, रुग्णवाहिका सुविधा, तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना गती देण्यात आली. प्रशासनात पारदर्शकता आणि शिस्त आणण्यासाठी नियमित बैठकींचा धडाका त्यांनी लावला.
भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांची बदली झाली. त्यानंतर त्यांची नियुक्ती पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी येथे सीईओ म्हणून करण्यात आली.
एकूणच, मनीषा आव्हाळे यांच्या सोलापुरातील कार्यकाळाकडे केवळ प्रशासकीय नव्हे तर मानवी दृष्टिकोनातून घेतलेल्या निर्णयांमुळे ‘टर्निंग पॉईंट’ म्हणून पाहिले जाते. आणि जिल्हा परिषद समोरील “बगीचा” हा त्या कार्याचा आजही जिवंत साक्षीदार ठरत आहे.



