क्राईम

मंडळ अधिकाऱ्यांच्या नावावर चालकाने घेतली लाच; रंगेहात पकडल्याने महसूल खात्यात खळबळ

मंडळ अधिकाऱ्यांच्या नावावर चालकाने घेतली लाच; रंगेहात पकडल्याने महसूल खात्यात खळबळ

सोलापूर (प्रतिनिधी):- शेतजमिनीच्या खरेदीची नोंद सातबारा उताऱ्यावर करून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सांगोला तहसील कार्यालयातील मंडळ अधिकाऱ्यांच्या वतीने लाच स्वीकारणाऱ्या खासगी वाहन चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात श्रीमती विजया महारूद्र नाईक (वय ४५), मंडळ अधिकारी, संगेवाडी मंडळ, तहसील कार्यालय सांगोला आणि त्यांचे खासगी वाहन चालक वैभव पिराजी मोरे (वय २८, रा. मुंढेवाडी, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सांगोला पोलीस ठाण्यात सुरू आहे.

तक्रारदार यांच्या आईच्या नावावर खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तावर आलेल्या हरकतींचा निकाल तक्रारदारांच्या बाजूने लावून सातबारा उताऱ्यावर त्यांच्या आईचे नाव नोंदवून देण्यासाठी आरोपींकडून लाच मागण्यात आली होती. यासाठी मंडळ अधिकारी विजया नाईक यांनी तक्रारदारांना कामाबाबत बोलणी करण्यासाठी त्यांच्या खासगी वाहन चालक वैभव मोरे याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

त्यानंतर वैभव मोरे याने तक्रारदारांकडे तडजोडीअंती ७ हजार रुपयांची लाच मागितली. या मागणीची तक्रार तक्रारदारांनी एसीबी सोलापूर येथे दिल्यानंतर ५ मार्च २०२६ रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान मंडळ अधिकारी विजया नाईक यांनी चालकाने केलेल्या लाच मागणीस दुजोरा दिल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईदरम्यान वैभव पिराजी मोरे याने तक्रारदारांकडून ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राचे पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते, तसेच पोलीस अंमलदार संतोष नरोटे, गजानन किणगी, प्रियंका गायकवाड, अक्षय श्रीराम यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी एजंट कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले (एसीबी, सोलापूर) यांनी केले आहे.

नागरिकांना तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४, तसेच एसीबीचे अधिकृत संकेतस्थळ आणि व्हॉटसअॅप क्रमांक उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Oplus_16908288
दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!