महाराष्ट्र

“भारत गौरव” पर्यटक ट्रेनद्वारे ‘डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा’; 27 मार्चला सोलापूरहून प्रस्थान

“भारत गौरव” पर्यटक ट्रेनद्वारे ‘डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा’; 27 मार्चला सोलापूरहून प्रस्थान

सोलापूर :- भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड (IRCTC) तर्फे “भारत गौरव पर्यटक ट्रेन” द्वारे “डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा” हे विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक टूर पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 11 रात्री आणि 12 दिवसांची ही विशेष यात्रा 27 मार्च रोजी सोलापूर येथून प्रस्थान करणार असून प्रवाशांना राजस्थानच्या राजेशाही वारशाचा तसेच उज्जैनच्या आध्यात्मिकतेचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.

भारत सरकारच्या “देखो अपना देश” आणि “एक भारत श्रेष्ठ भारत” या उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने IRCTC ही विशेष पर्यटन यात्रा आयोजित करत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देशाची समृद्ध सांस्कृतिक व धार्मिक परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

IRCTC पश्चिम विभाग (मुंबई) चे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा यांनी या यात्रेबाबत माहिती देताना सांगितले की, ही विशेष पर्यटक ट्रेन 27 मार्च रोजी सोलापूर येथून प्रस्थान करणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड आणि सूरत या प्रमुख स्थानकांवरूनही ट्रेनमध्ये चढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या यात्रेदरम्यान प्रवाशांना उदयपूरचे नयनरम्य तलाव, नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिर, पुष्करचे पवित्र तीर्थ, जोधपूर आणि जयपूरचे ऐतिहासिक किल्ले व राजवाडे तसेच खाटू श्यामजी मंदिर यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय उज्जैन येथील भगवान महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन ही या यात्रेची प्रमुख आकर्षणे असणार आहेत. त्यामुळे ही यात्रा धार्मिक अनुभवासोबतच राजस्थानच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवाचा परिचय करून देणारी ठरणार आहे.

प्रवाशांच्या बजेटचा विचार करून या ट्रेनमध्ये तीन प्रकारच्या श्रेणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

* इकॉनॉमी क्लास (स्लीपर) – ₹19,900 प्रति व्यक्ती

* स्टँडर्ड क्लास (3 एसी) – ₹31,920 प्रति व्यक्ती

* कम्फर्ट क्लास (2 एसी) – ₹41,840 प्रति व्यक्ती

सुमारे 750 प्रवाशांची क्षमता असलेल्या या विशेष ट्रेनमध्ये सोलापूर, पुणे, कल्याण, वसई रोड आणि सूरत या प्रमुख स्थानकांवर चढणे व उतरण्याची सुविधा देण्यात आली आहे.

IRCTC पश्चिम विभाग, मुंबईचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंह यांनी सांगितले की ही यात्रा “ऑल-इन्क्लुसिव्ह पॅकेज” स्वरूपात तयार करण्यात आली आहे. या पॅकेजमध्ये रेल्वे प्रवास, शुद्ध शाकाहारी भोजन, हॉटेलमध्ये निवास व्यवस्था, स्थानिक पर्यटनासाठी बस सेवा, टूर एस्कॉर्ट तसेच प्रवास विमा यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि संस्मरणीय प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

या यात्रेबाबत अधिक माहिती व बुकिंगसाठी इच्छुक प्रवाशांनी IRCTC च्या अधिकृत पर्यटन संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवळच्या IRCTC पर्यटन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!