सोलापूर जिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन
संविधान अभिवादन, भीम गीत, प्रबोधनपर व्याख्यानांचा समावेश; समाजकल्याण विभागाचा पुढाकार

सोलापूर जिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन
संविधान अभिवादन, भीम गीत, प्रबोधनपर व्याख्यानांचा समावेश; समाजकल्याण विभागाचा पुढाकार
सोलापूर (प्रतिनिधी) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेत दि. १४ एप्रिल रोजी विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद परिसरातील संविधान कोनशिलेस सकाळी १० वाजता पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून, त्यानंतर मुख्य कार्यक्रमांना प्रारंभ होईल.
यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित ‘समता रजनी’ कार्यक्रमात भीम शाहिर संदिप शिंदे प्रबोधन मंच, सोलापूर यांच्या माध्यमातून प्रा. जीवन संदिप शिंदे व त्यांच्या संचाकडून भीम गीतांचे प्रभावी सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमातून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे.
कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार असून, पुणे येथील निलेश विमल धायरकर हे ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान देणार आहेत. तसेच समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक सत्कारही करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अॅड. अमृता वाघे तसेच जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर आणि सर्व विभागांचे खातेप्रमुख यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.
*तालुकास्तरावरही स्पर्धांचा उत्साह*
डॉ. आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. इयत्ता ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १४ एप्रिल २०२६ रोजी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांमध्ये डॉ. आंबेडकरांचे विचार, महिलांच्या उन्नतीसाठी त्यांचे योगदान, तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त त्याचे महत्त्व यावर भाष्य करण्यात येणार आहे. तसेच संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांनी मांडायचे आहे.
स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. ११,०००, रु. ९,००० व रु. ७,००० अशी रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून, ही पारितोषिके १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी वितरित करण्यात येणार आहेत.
एकूणच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात सामाजिक समता, संविधान मूल्ये आणि प्रबोधनाचा संदेश विविध उपक्रमांद्वारे प्रभावीपणे पोहोचवला जाणार आहे.



