सामाजिक समता सप्ताहानिमित्त सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; विविध उपक्रमांनी वातावरण भारावले
संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून समतेचा संदेश; मान्यवरांची उपस्थिती

सामाजिक समता सप्ताहानिमित्त सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; विविध उपक्रमांनी वातावरण भारावले
संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून समतेचा संदेश; मान्यवरांची उपस्थिती
सोलापूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक समता सप्ताहाचा समारोप आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीदिनी सोलापुरात विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला.
दि. ८ ते १४ एप्रिल या कालावधीत जिल्हाभर विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. त्याच अनुषंगाने आज सोलापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास महापौर विनायक कोंडयाल, आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. यानंतर समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत खून प्रकरणातील वारस आनंद भारत लोंढे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शासकीय नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. या घटनेमुळे कार्यक्रमाला सामाजिक न्यायाची ठोस दिशा मिळाल्याचे दिसून आले.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास उत्तर व दक्षिण सोलापूर येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी सहायक आयुक्त, समाज कल्याण सोलापूर कार्यालयामार्फत करण्यात आली.



