“संविधान वाचवण्यासाठी लोकलढा उभारण्याची वेळ; शंकर पाटील यांचे थेट आवाहन”
“बसवण्णा–फुले–आंबेडकर विचारच समतेचा पाया”
“संविधान वाचवण्यासाठी लोकलढा उभारण्याची वेळ; शंकर पाटील यांचे थेट आवाहन”
“बसवण्णा–फुले–आंबेडकर विचारच समतेचा पाया”
सोलापूर (प्रतिनिधी) :- “संविधान हा देशाचा आत्मा असून त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मात्र आज धर्मकेंद्रित राजकारणामुळे संविधानिक मूल्यांवर गदा येत आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे,” असे ठाम प्रतिपादन शंकर पाटील यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समिती यांच्या वतीने वसुंधरा महाविद्यालय येथे आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ते बोलत होते. हा कार्यक्रम महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता.
“जातविरहित समाजव्यवस्थेची संकल्पना : महात्मा बसवण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान” या विषयावर बोलताना पाटील यांनी भारतीय समाजव्यवस्था, सामाजिक भान आणि सध्याची जबाबदारी यावर सखोल भाष्य केले.
ते पुढे म्हणाले की, महात्मा बसवण्णा यांनी १२ व्या शतकात समतेची क्रांती घडवून आणली. “कायकवे कैलास” ही जीवनपद्धती सांगत त्यांनी श्रमाला देवत्व दिले आणि जन्मावर आधारित श्रेष्ठत्व नाकारले. मात्र आजच्या काळात कर्मकांड आणि अंधश्रद्धेचे उदात्तीकरण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्या राजकीय पक्षांनीही धर्मनिरपेक्ष भूमिकेशी तडजोड केल्याचा आरोप करत, सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांनी टीका केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते तथा शाहू परिवाराचे प्रमुख प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अंबादास पांढरे होते.
प्रास्ताविक करताना आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रा. एम. आर. कांबळे यांनी सोलापूर शहराचा विस्तार होत असताना वैचारिक गरज लक्षात घेऊन जुळे सोलापूर परिसरात तीन दिवसीय व्याख्यानमाला सुरू केल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रस्तावनेच्या वाचनाने करण्यात आली. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, नामदेव पवार, प्रशांत बाबर, ज्येष्ठ विधीज्ञ मेत्रस, राजू मानकर, यश आठवले यांच्यासह जुळे सोलापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पुढील सत्र (पुष्प दुसरे)*
रविवार, १२ एप्रिल २०२६
विषय : “डॉ. आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून संविधानिक आरक्षण आणि न्यायालयाची भूमिका”
वक्ते : प्रा. डॉ. विजय माकणीकर
अध्यक्ष : निजामुद्दिन शेख
या व्याख्यानमालेतून संविधानिक मूल्ये, समता आणि सामाजिक न्याय याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न होत असून, नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




