सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल; सीईओ कुलदीप जंगम यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
ई-गव्हर्नन्स व सेवाकर्मी कार्यक्रमात दमदार कामगिरी; 28 मार्चला मुंबईत गौरव सोहळा

सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल; सीईओ कुलदीप जंगम यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
ई-गव्हर्नन्स व सेवाकर्मी कार्यक्रमात दमदार कामगिरी; 28 मार्चला मुंबईत गौरव सोहळा
मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम आणि सेवाकर्मी उपक्रमांत उत्कृष्ट कामगिरी करत सोलापूर जिल्हा परिषदने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
हा सन्मान सोहळा शनिवार, दिनांक 28 मार्च 2026 रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे पार पडणार असून, राज्यभरातील निवडक उत्कृष्ट कार्यालय प्रमुखांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सचिवालयातील उपसचिव हनुमंत आरगुंडे यांच्या पत्रानुसार, कार्यक्रमात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाचे सादरीकरण करण्यासाठी विशेष संधी देण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे आपल्या कामगिरीचे सादरीकरण करणार असून, त्यांना 8 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदने डिजिटल प्रशासन, ई-गव्हर्नन्स सुधारणा आणि नागरिकाभिमुख सेवा यामध्ये केलेल्या प्रभावी कामामुळे हा मान मिळाला आहे. प्रशासनातील पारदर्शकता, जलद सेवा वितरण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यामुळे जिल्ह्याची कामगिरी राज्यात उठून दिसली आहे.
दरम्यान, संबंधित विभागातील इतर अधिकारी व अधिनस्त कार्यालय प्रमुखांना ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदच्या या यशामुळे जिल्ह्याची प्रशासनिक ओळख अधिक बळकट झाली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या नेतृत्वाखालील कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



