तृतीयपंथीयांसाठी मोठी संधी; राज्यात ‘बीज भांडवल योजना’ लागू
स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत; अनुदान + बँक कर्जासह व्यवसायाला चालना
तृतीयपंथीयांसाठी मोठी संधी; राज्यात ‘बीज भांडवल योजना’ लागू
स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत; अनुदान + बँक कर्जासह व्यवसायाला चालना
सोलापूर (प्रतिनिधी):- तृतीयपंथीयांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत “बीज भांडवल योजना” राज्यात लागू केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 13 मार्च 2026 च्या शासन निर्णयानुसार ही योजना राबविण्यात येणार असून, तृतीयपंथीयांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यावर भर देण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामध्ये
५% लाभार्थी हिस्सा
४५% शासन अनुदान
५०% बँक कर्ज
अशा स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
योजनेत तीन स्तरांवर आर्थिक मदत दिली जाणार आहे..
लघु कर्ज : ₹२५,०००
मध्यम कर्ज : ₹५०,०००
दीर्घ कर्ज : ₹२,००,०००
या निधीतून भाजीपाला स्टॉल, जनरल स्टोअर्स, बेकरी, ब्युटी पार्लर, मोबाईल दुरुस्ती यांसारखे छोटे-मोठे व्यवसाय सुरू करता येणार आहेत.
फक्त आर्थिक मदतच नव्हे, तर लाभार्थ्यांना कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांना व्यवसाय यशस्वीपणे उभारण्यास मदत होणार आहे.
या योजनेसाठी अर्जदाराने..
महाराष्ट्रात किमान 10 वर्षे वास्तव्य केलेले असावे
वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे
सक्षम प्राधिकरणाकडून तृतीयपंथीय ओळखपत्र असणे आवश्यक
इच्छुक लाभार्थ्यांनी निर्धारित नमुन्यात अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर कार्यालयात सादर करावा.
या योजनेमुळे तृतीयपंथीय घटकांना आर्थिक स्थैर्य आणि समाजात सन्मानाने जगण्याची नवी संधी मिळेल, असे सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी सांगितले.



