समुद्रकिनाऱ्यावर स्टंट महागात! सोलापूरच्या कामगाराच्या मानेचे ५ मणके मोडले

समुद्रकिनाऱ्यावर स्टंट महागात! सोलापूरच्या कामगाराच्या मानेचे ५ मणके मोडले
सोलापूर :- सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेली सहल एका तरुणासाठी आयुष्यभराची वेदना ठरली आहे. सोलापुरातील लष्कर भागात राहणारा बांधकाम कामगार वसंत जमादार हा आपल्या मित्रांसोबत उडीसा राज्यातील जगन्नाथपुरी येथे दर्शनासाठी गेला होता. दर्शनानंतर परतण्यापूर्वी वेळ शिल्लक असल्याने सर्व मित्र समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. मात्र, याच वेळी झालेल्या धोकादायक स्टंटमुळे गंभीर अपघात घडला.
समुद्रकिनारी लाटांमध्ये स्टंटबाजी करताना वसंत जमादारने डोक्यावर पाठीमागे उडी मारली. या चुकीच्या अंदाजामुळे तो जोरात आदळला आणि त्याच्या मानेच्या मणक्यांवर गंभीर आघात झाला. या अपघातात त्याच्या मानेचे तब्बल ५ मणके मोडले.
घटनेनंतर मित्रांनी तात्काळ त्याला समुद्रातून बाहेर काढून स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील उपचारांचा खर्च परवडत नसल्यामुळे मित्रांनी मोठी धडपड करत द्राक्ष वाहतुकीसाठी आलेल्या टेम्पोमधून त्याला सोलापूरला आणले.
सोलापुरातील सहकारी रुग्णालयात त्याच्यावर तब्बल ९ तासांची अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत. या घटनेने त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार पूर्णपणे हादरून गेले आहेत.
दरम्यान, वसंत जमादार हा ज्येष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे यांच्या मंद्रूप येथील बांधकामावर फरशीकरणाचे काम करत होता. कामाच्या संदर्भात संपर्क साधताना सारोळे यांना या अपघाताची माहिती मिळाली. ही घटना ऐकून त्यांनाही मोठा धक्का बसला असून परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
सुट्टीत पर्यटन करताना किंवा समुद्रकिनारी फिरताना धोकादायक स्टंट करण्याचा मोह टाळा. क्षणिक मजा आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते.



