सोलापूर जिल्ह्याला विकासाची मोठी चालना! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा २९.२२ कोटींचा निधी
सोलापूर जिल्ह्याला विकासाची मोठी चालना! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा २९.२२ कोटींचा निधी
सोलापूर :- जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित प्रतिनिधींना दिलेले आश्वासन पूर्ण करत पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी तब्बल २९ कोटी २२ लाख रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण विकास कामांना मोठी गती मिळणार आहे.
जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या यशानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वावर जनतेने ठेवलेला विश्वास आता प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचे चित्र दिसत आहे.
माहितीनुसार, केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानातून सोलापूर जिल्हा परिषदेस १४ कोटी ६१ लाख रुपये, तर जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांसाठीही १४ कोटी ६१ लाख रुपये असा एकूण २९ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी दिनांक २३ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार वितरित करण्यात आला आहे.
*तालुकानिहाय पंचायत समिती निधी वाटप*
* अक्कलकोट – १ कोटी २९ लाख
* बार्शी – १ कोटी २३ लाख
* करमाळा – १ कोटी २५ लाख
* माढा – १ कोटी ५१ लाख
* माळशिरस – १ कोटी ९३ लाख
* मोहोळ – १ कोटी २२ लाख
* मंगळवेढा – १ कोटी ८३ हजार
* उत्तर सोलापूर – ६५ लाख ९६ हजार
* पंढरपूर – १ कोटी ६७ लाख
* दक्षिण सोलापूर – १ कोटी ४७ लाख
* सांगोला – १ कोटी ३४ लाख
*एकूण पंचायत समिती निधी : १४ कोटी ६१ लाख*
निवडणुकीदरम्यान पालकमंत्री गोरे यांनी “विकासासाठी थेट निधी” देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन केवळ प्रचारापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी प्रत्यक्षात उतरवले आहे. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या जि.प. आणि पं.स. सदस्यांना त्यांच्या गटात आणि गणात विकासकामे राबविण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे.
या निधीमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि इतर विकासकामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या निर्णयाचे स्वागत करत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी पालकमंत्री गोरे यांचे आभार मानले आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण असून, विकासाच्या कामांना आता वेग येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होऊन गावागावात प्रत्यक्ष विकास दिसावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



