“आचरणातूनच खरा अभिवादन” – बाबासाहेब जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम सोलापुरात
स्वाक्षरीच्या पेनद्वारे विचारांचा प्रसार; समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

“आचरणातूनच खरा अभिवादन” – बाबासाहेब जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम सोलापुरात
स्वाक्षरीच्या पेनद्वारे विचारांचा प्रसार; समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
सोलापूर (प्रतिनिधी):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात “स्मरण नव्हे, आचरणाचा संकल्प” हा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजात बाबासाहेबांचे विचार केवळ बोलण्यात न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरावेत, या उद्देशाने हा उपक्रम विशेष ठरत आहे.


दि. १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत ‘जनता संघर्ष न्यूज’ चॅनलच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना बाबासाहेबांच्या स्वाक्षरीचे प्रतीक असलेला विशेष पेन देऊन सन्मानित करण्यात येत आहे. या पेनच्या माध्यमातून ज्ञान, समानता आणि न्याय या मूल्यांचा संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या उपक्रमात प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, चळवळीतील कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना बाबासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी जपण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.


या उपक्रमाबाबत बोलताना पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी दिलेले विचार केवळ स्मरणापुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष आयुष्यात उतरवणे हीच खरी त्यांना अभिवादन ठरेल. नव्या पिढीपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सोलापुरात राबविण्यात येत असलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, सामाजिक जाणिवा दृढ करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
हा उपक्रम केवळ जयंती साजरी करण्यापुरता मर्यादित नसून, बाबासाहेबांच्या विचारांना कृतीत आणण्याचा एक प्रभावी प्रयत्न ठरत आहे.




