Prabuddha Raj

Latest Marathi News

दुधनी नगरपालिकेत सत्तांतराचा उत्साह; प्रथमेश म्हेत्रेंनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, जिलानी नाकेदार उपनगराध्यक्ष

दुधनी नगरपालिकेत सत्तांतराचा उत्साह; प्रथमेश म्हेत्रेंनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, जिलानी नाकेदार उपनगराध्यक्ष

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- दुधनी नगरपालिकेत मंगळवारी (दि. १३ जानेवारी) नव्या सत्ताकाळाला अधिकृत प्रारंभ झाला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. वाद्यवृंद, फटाके आणि नागरिकांच्या शुभेच्छांच्या गजरात दुधनीकरांनी नूतन नगराध्यक्षांचे जंगी स्वागत केले.

नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्व २० पैकी २० जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताना प्रथमेश म्हेत्रे यांनी दुधनीच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पदभार स्वीकारल्यानंतर नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षपदासाठी जिलानी चांदसाब नाकेदार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून डॉ. उदयकुमार म्हेत्रे व बसवराज रायप्पा हौदे यांचीही बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

या वेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहर यांनी प्रशासनाच्या वतीने नूतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नूतन नगरसेवकांचा सत्कार केला. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर म्हेत्रे, वैशाली शंकर म्हेत्रे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नव्या नेतृत्वाकडून शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.