ब्लिंकीटची १० मिनिटांत डिलिव्हरी सेवा रद्द; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय
मुंबई (प्रतिनिधी):- ग्राहकांना अवघ्या दहा मिनिटांत अत्यावश्यक वस्तू पोहोचवण्याचा दावा करणाऱ्या ब्लिंकीट या ऑनलाइन डिलिव्हरी कंपनीने आपली १० मिनिटांत डिलिव्हरी ही सुविधा रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रामुख्याने डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेण्यात आला असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
ब्लिंकीटच्या अतिजलद डिलिव्हरीमुळे डिलिव्हरी बॉयवर वेळेचे प्रचंड दडपण येत होते. कमी वेळेत ऑर्डर पूर्ण करण्याच्या स्पर्धेत अनेक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगवान वाहन चालवणे तसेच अपघातांचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. याची दखल घेत कंपनीने मानवी सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेतला आहे.
कंपनीच्या अधिकृत निवेदनानुसार, ग्राहकांना थोडा उशीर सहन करावा लागला तरीही कर्मचाऱ्यांचे प्राण व आरोग्य अधिक महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आता डिलिव्हरीसाठी वेळेची मर्यादा वास्तववादी ठेवण्यात येणार असून कर्मचाऱ्यांवर अनावश्यक ताण येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयाचे कर्मचारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून, अतिजलद डिलिव्हरीच्या नावाखाली सुरू असलेल्या धोकादायक कामकाजावर आळा बसल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे काही ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली असली, तरी बहुतांश नागरिकांनी हा निर्णय योग्य आणि आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
डिजिटल युगात सेवा महत्त्वाची असली तरी मानवी जीवापेक्षा कोणतीही सेवा मोठी नाही, हे या निर्णयातून अधोरेखित झाले आहे.

More Stories