Prabuddha Raj

Latest Marathi News

१० जानेवारीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेकडे सोलापूरकरांचे लक्ष; नव्या विकास घोषणांची उत्सुकता

१० जानेवारीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेकडे सोलापूरकरांचे लक्ष; नव्या विकास घोषणांची उत्सुकता

सोलापूर (प्रतिनिधी):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे बोलतात ते प्रत्यक्षात उतरवतात, हा अनुभव सोलापूरकरांना वारंवार आला आहे. उजनी–सोलापूर दुहेरी जलवाहिनी, विमानसेवा आणि आयटी पार्कसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनंतर आता सोलापूरला पुढे काय मिळणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर १० जानेवारी रोजी हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेबाबत शहरात उत्सुकता निर्माण झाली आहे.

सोलापूरच्या विकासाला दिशा देणाऱ्या निर्णयांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी त्यांनी दिलेली हमी आणि त्यानुसार उजनी–सोलापूर दुहेरी पाईपलाईन प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेला ८९२ कोटी रुपयांचा निधी, हे त्याचे ठळक उदाहरण मानले जात आहे. या प्रकल्पामुळे सोलापूरकरांचा अनेक वर्षांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून बंद असलेली सोलापूरची विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले. सोलापूर–गोवा विमानसेवा सुरू झाल्यानंतर सोलापूर–मुंबई विमानसेवाही कार्यान्वित झाली आहे. याशिवाय सोलापूरहून तिरुपती व बेंगळुरूकडे विमानसेवा सुरू करण्याबाबतही सकारात्मक हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

दहिटणे येथे झालेल्या कार्यक्रमात सोलापुरात आयटी पार्क उभारण्याची घोषणा करून अवघ्या काही महिन्यांत त्यासाठी जागा निश्चित होऊन काम सुरू झाले आहे. आयटी पार्कमुळे भविष्यात सोलापुरात आयटी कंपन्या दाखल होतील आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आता १० जानेवारी रोजी होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरकरांसाठी आणखी कोणत्या नव्या घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजपर्यंत केलेल्या घोषणा वेळेत पूर्ण केल्यामुळे सोलापूरकरांचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

या विकास प्रक्रियेला गती देण्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने सोलापूरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दरम्यान, १० जानेवारीच्या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. सर्वसामान्य सोलापूरकरांना आता एकच अपेक्षा आहे—या सभेतून सोलापूरच्या विकासाला नवे पर्व सुरू होईल.