कमलापूरमध्ये शिवाली परब-संदीप पाठक यांची उपस्थिती; समृद्ध पंचायतराज अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कमलापूरमध्ये शिवाली परब-संदीप पाठक यांची उपस्थिती; समृद्ध पंचायतराज अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगोला (प्रतिनिधी):- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील कमलापूर गावात मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शिवाली परब आणि अभिनेता संदीप पाठक यांनी भेट दिल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमात ग्रामविकास, स्वच्छता व लोकसहभागाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

या प्रसंगी आमदार बाबासाहेब देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांच्या पारंपारिक लेझीम खेळाच्या सादरीकरणाने झाली. विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली.

अभिनेत्री शिवाली परब आणि अभिनेता संदीप पाठक यांना पाहण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उघड्या जीपमधून गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान कलाकारांनी नागरिकांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. या मिरवणुकीमुळे संपूर्ण गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

गावात आगमनानंतर कलाकारांनी ग्रामस्थांसमवेत वृक्षारोपण तसेच स्वच्छता अभियान राबविले. यापूर्वी ज्या ठिकाणी टाकाऊ कचरा टाकण्यात येत होता, त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत बसविण्यात आलेल्या कारंज्यांची पाहणीही त्यांनी केली. यामुळे गावातील बदलाची सकारात्मक झलक नागरिकांना अनुभवता आली.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी कुलकर्णी, ग्रामविकास विभागाचे बिभीषण पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले, सरपंच रूपाली सतीश तंडे, उपसरपंच सुमन दत्तात्रय पुजारी, पंचायत अधिकारी संजय खटकाळे, विस्तार अधिकारी तोडकरी यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कलावंतांच्या या भेटीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, ग्रामविकास, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीस चालना मिळाल्याचे चित्र कमलापूरमध्ये दिसून आले.



