२९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान; संबंधित क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
२९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान; संबंधित क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संबंधित मतदानक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
या अधिसूचनेनुसार, संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रांमध्ये येणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे तसेच राज्य सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विविध कार्यालयांना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. ही सुट्टी केवळ कार्यालयांपुरती मर्यादित नसून, संबंधित क्षेत्रातील सर्व मतदारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
विशेष म्हणजे, मतदानक्षेत्राबाहेर कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या मतदारांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरगावी नोकरी किंवा सेवेत असलेले मतदारसुद्धा आपल्या मतदारसंघात येऊन मतदान करू शकणार आहेत.
राज्य सरकारने ही अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयांच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढावा आणि मतदानाचा टक्का उंचावावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकांसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण करण्यावर भर दिला असून, शांततापूर्ण आणि भयमुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.



