सोलापूर

महापालिका निवडणुकीसाठी कामगारांना मतदानाचा अधिकार; भरपगारी सुट्टी किंवा वेळेची सवलत देण्याचे आवाहन

महापालिका निवडणुकीसाठी कामगारांना मतदानाचा अधिकार; भरपगारी सुट्टी किंवा वेळेची सवलत देण्याचे आवाहन

सोलापूर (प्रतिनिधी):- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी जिल्ह्यातील खाजगी आस्थापना, उद्योग व दुकानदारांनी आपल्या कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा आवश्यक त्या वेळेची सवलत द्यावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त अति. मंगेश झोले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचारी, कामानिमित्त त्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक राहणार आहे. ही तरतूद उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या अखत्यारीतील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खाजगी कंपन्या, हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापारी व औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि रिटेल आस्थापनांना लागू राहणार आहे.

अपवादात्मक परिस्थितीत, जिथे कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा ज्या आस्थापना अत्यावश्यक व लोकोपयोगी सेवांशी संबंधित आहेत, तेथे पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसेल. अशा वेळी संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आस्थापना मालक व व्यवस्थापनांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले असून, मतदानासाठी आवश्यक ती सुट्टी अथवा सवलत न मिळाल्यामुळे कामगार मतदान करू शकले नाहीत, अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील कामगारांसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, सोलापूर यांच्या स्तरावर दक्षता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मतदानासाठी सुट्टी अथवा वेळेची सवलत न दिल्यास कामगारांनी दूरध्वनी क्रमांक ०२१७-२७२८४०१ वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा असून, कामगारांना निर्बंधांशिवाय मतदान करता यावे, यासाठी सर्व आस्थापना मालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!