Prabuddha Raj

Latest Marathi News

अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट : २६ प्रभागांत राजकीय रंगत,२५ जागांवर अटीतटीची लढत

Oplus_16908288

अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट : २६ प्रभागांत राजकीय रंगत,२५ जागांवर अटीतटीची लढत

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, भारतीय जनता पक्षाला बहुतांश बंडखोरांना रोखण्यात यश मिळाले आहे. मात्र, सर्वच २६ प्रभागांमध्ये चुरशीच्या लढती होणार असून, त्यापैकी तब्बल २५ जागांवर तुल्यबळ राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी होती. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. भाजपकडून एक हजारहून अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने पक्षांतर्गत बंडखोरी अटळ मानली जात होती. विशेषतः प्रभाग क्रमांक १, ३, १० आणि ११ मध्ये बंडखोरांची संख्या मोठी होती. तथापि, आमदारांच्या मध्यस्थीने आणि समन्वयातून बहुतांश बंडखोरी शमविण्यात आली.

आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या समर्थकांची काही ठिकाणी बंडखोरी अद्याप कायम आहे. प्रभाग १ आणि ३ मधील बंडखोरी आ. विजयकुमार देशमुख यांनी आटोक्यात आणली, तर प्रभाग १० व ११ मधील बंडखोरी रोखण्यात आ. देवेंद्र कोठे यांना यश मिळाले. प्रभाग २५ मधील बंडखोरीही शमविण्यात आली आहे.

प्रमुख लढती ठरणार केंद्रस्थानी

भाजपविरुद्ध शिंदेसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), तसेच काही ठिकाणी उद्धवसेना व एमआयएम यांच्यात थेट सामना रंगणार आहे.

प्रभाग ३ ड : भाजपचे संजय कोळी विरुद्ध शिंदेसेनेचे सुरेश पाटील

प्रभाग ४ अ : भाजपच्या वंदना गायकवाड विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार)च्या कविता चंदनशिवे

प्रभाग ४ ब : भाजपचे विनायक विटकर विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार)चे सुशील बंदपट्टे

प्रभाग ५ ड : भाजपचे बिज्जू प्रधाने विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार)चे गणेश पुजारी, अपक्ष राजू आलुरे

प्रभाग ६ ड : भाजपचे गणेश वानकर विरुद्ध शिंदेसेनेचे मनोज शेजवाल

प्रभाग ७ क : भाजपच्या उत्तरा बचुटे-बरडे विरुद्ध शिंदेसेनेच्या मनोरमा सपाटे

प्रभाग ७ ड : भाजपचे पद्माकर काळे विरुद्ध शिंदेसेनेचे अमोल शिंदे

प्रभाग ९ ड : भाजपचे मेघनाथ येमूल विरुद्ध उद्धवसेनेचे सुरेश गायकवाड
काँग्रेस-भाजप थेट संघर्ष

प्रभाग १५ अ : भाजपच्या श्रीदेवी फुलारे विरुद्ध काँग्रेसच्या सपना मंगेरी

प्रभाग १५ क : भाजपचे विनोद भोसले विरुद्ध काँग्रेसचे आरिफ शेख

प्रभाग १५ ड : काँग्रेसचे चेतन नरोटे विरुद्ध भाजपचे अंबादास करगुळे

प्रभाग १६ ड : भाजपचे दिलीप कोल्हे विरुद्ध काँग्रेसचे नरसिंग कोळी

प्रभाग १७ ड : भाजपचे रवी कय्यावाले विरुद्ध काँग्रेसचे वाहिद विजापुरे
इतर महत्त्वाच्या लढती

प्रभाग २० क : एमआयएमचे अजहर हुंडेकरी विरुद्ध भाजपचे झिशान सय्यद

प्रभाग २० ड : राष्ट्रवादी (अजित पवार)चे तौफीक शेख विरुद्ध भाजपचे अमीर शेख

प्रभाग २१ ब : काँग्रेसचे रियाज हुंडेकरी विरुद्ध भाजपचे शिवाजी वाघमोडे

प्रभाग २२ ड : भाजपचे किसन जाधव विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार)चे जुबेर शेख, अपक्ष शीतल गायकवाड

प्रभाग २३ अ : राष्ट्रवादी (शरद पवार)च्या सुनीता रोटे विरुद्ध भाजपचे सत्यजीत वाघमोडे

प्रभाग २३ ब : भाजपच्या आरती वाकसे विरुद्ध काँग्रेसच्या दीपाली शहा, अपक्ष मेनका राठोड

प्रभाग २३ ड : उद्धवसेनेचे लक्ष्मण जाधव विरुद्ध शिंदेसेनेचे प्रकाश राठोड, भाजपचे राजशेखर पाटील

प्रभाग २४ अ : काँग्रेसचे शिवलिंग कांबळे विरुद्ध भाजपचे मधुसूदन जंमग

प्रभाग २४ ब : शिंदेसेनेच्या उषा काळे विरुद्ध भाजपच्या वनिता पाटील

प्रभाग २५ ब : भाजपचे नागेश ताकमोगे विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार)चे वैभव हत्तुरे

दरम्यान, भाजपची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी कायम ठेवणाऱ्या काही उमेदवारांना स्थानिक आमदारांचे अप्रत्यक्ष पाठबळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक सोलापूरकरांसाठी अत्यंत चुरशीची व निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.