सोलापूर

मकरसंक्रांतीत नायलॉन मांजावर बंदी; सोलापूर शहरात ३० जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

मकरसंक्रांतीत नायलॉन मांजावर बंदी; सोलापूर शहरात ३० जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

सोलापूर (प्रतिनिधी ):- मकरसंक्रांती व त्यानंतरच्या काळात सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्याचा उत्सव साजरा केला जातो. मात्र, या काळात नायलॉन, प्लास्टिक किंवा सिंथेटीक मटेरियलपासून बनविलेल्या मांजाच्या वापरामुळे नागरिक, पशुपक्षी व पर्यावरणास गंभीर धोका निर्माण होत असल्याने पोलिस आयुक्त, सोलापूर शहर एम. राजकुमार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.

हा आदेश दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ००.०१ वाजल्यापासून ते दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा अथवा नायलॉन, प्लास्टिक किंवा सिंथेटीक मटेरियलपासून बनविलेला कोणताही दोरा वापरणे, बाळगणे, विक्री करणे व साठवणूक करण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात आला आहे.

दरवर्षी मकरसंक्रांतीदरम्यान वापरण्यात येणारा पक्का दोरा हा अत्यंत धारदार असून त्यामुळं दुचाकीस्वार, पादचारी नागरिकांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. तसेच आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना जखमी होणे, त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणे, तसेच जनावरे चारा खाताना चुकून नायलॉन मांजा गिळल्यामुळे शारीरिक समस्या निर्माण होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

याशिवाय तुटलेले पतंगाचे दोरे रस्ते, गटारी, ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईन, नद्या व नाल्यांमध्ये अडकून तुंबण्याचे प्रकार घडतात. नायलॉन, प्लास्टिक किंवा सिंथेटीक साहित्य हे नैसर्गिकरित्या विघटन न होणारे असल्याने पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होतो.

या सर्व बाबी लक्षात घेता, नागरिकांचे जीवन व मालमत्तेचे संरक्षण, पशुपक्षी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार शिक्षेस पात्र ठरविण्यात येईल, असे पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!