क्राईम

टेंभुर्णी पोलिसावर प्राणघातक हल्ला, पोलीसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय…?

टेंभुर्णी पोलिसावर प्राणघातक हल्ला, पोलीसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय…?

टेंभुर्णी (प्रतिनिधी):- सरकारी कर्तव्य बजावत असताना पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र अशोक शेटे हे डायल 112 वर कर्तव्य बजावत असताना महादेव तुपसौंदर (रा. अकुंबे, ता. माढा) यांनी दोन इसमांकडून मारहाण झाल्याची माहिती दिली. तसेच, “माझ्या जीवाला धोका आहे, तातडीने पोलीस मदत हवी,” असेही त्यांनी कळवले.

त्यानुसार, पो.कॉ. शेटे हे मदतीसाठी घटनास्थळी रवाना झाले. मौजे आलेगाव बुद्रुक, भीमनगर रोड परिसरात ते कॉलर महादेव तुपसौंदर यांच्याशी सरकारी गणवेशात बोलत असताना, दि. १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता ग्रे रंगाची विटारा ब्रिझा कार भरधाव वेगात तेथे आली. वाहनातील तिघांनी पोलीस गणवेश पाहताच संतप्त प्रतिक्रिया देत “तू इथे का आलास?” असे म्हणत पो.कॉ. शेटे यांच्याशी वाद घातला.

शेटे यांनी आपण शासकीय कर्तव्यावर असल्याचे सांगितले असतानाच वाहनातील तिघे खाली उतरले आणि त्यांनी पो.कॉ. शेटे यांची कॉलर पकडून ढकलाढकली करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी कॉलर महादेव तुपसौंदर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही ढकलून देण्यात आले.

आरोपींनी काठीने शेटे यांच्या उजव्या हातावर मारहाण केली. तसेच, एकाने दगड उचलून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो वार चुकवण्याचा प्रयत्न करत असताना दगड घसरून शेटे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लागला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना चक्कर येऊ लागली व ते खाली बसले. त्यानंतर दोघांनी त्यांना धरून ठेवले, तर तिसऱ्याने “या पोलिसाला जिवंत सोडायचे नाही,” असे म्हणत पुन्हा दगडाने हल्ला केला.

सरकारी गणवेशातील पोलिसावर सुरू असलेली मारहाण पाहून रस्त्यावरील नागरिकांनी गाड्या थांबवत हस्तक्षेप केला व पो.कॉ. शेटे यांची सुटका केली. दरम्यान, गावातील नागरिकांची गर्दी जमू लागल्याने आरोपी घटनास्थळावरून वाहनासह फरार झाले.

जखमी पो.कॉ. शेटे यांच्यावर मार्स हॉस्पिटल, टेंभुर्णी येथे उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी मारहाण करणाऱ्यांची नावे निष्पन्न करून 1) रविंद्र रामचंद्र चंदनकर, 2) रामचंद्र तुकाराम चंदनकर (दोघे रा. आलेगाव बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर) व 3) रामचंद्र तुकाराम चंदनकर यांचा जावई यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने करीत असून, आरोपींच्या शोधासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

टेंभुर्णी पोलीसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय…? अशी टेंभुर्णीतील प्रत्येक चौकात नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!