Prabuddha Raj

Latest Marathi News

अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस; सोलापूर महापालिकेत बंडखोरांना शांत करण्याची धावपळ

Oplus_16908288

अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस; सोलापूर महापालिकेत बंडखोरांना शांत करण्याची धावपळ

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, एकूण १०२ जागांसाठी तब्बल १४३० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच इच्छुक उमेदवार, पक्ष पदाधिकारी आणि समर्थकांची निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

मुख्य राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असल्याने अनेक प्रभागांमध्ये बंडखोरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले बंडखोर उमेदवार अर्ज माघारी घेण्यास तयार व्हावेत यासाठी पक्ष नेतृत्वाकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. काही बंडखोरांना आगामी काळात स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याचे, तर काहींना डीपीसी ( जिल्हा नियोजन समिती) वर स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, अर्ज माघारीनंतरच अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून, कोणत्या प्रभागात कोणामध्ये थेट सामना होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक प्रभागांत एकाच पक्षाचे दोन-दोन, तीन-तीन उमेदवार रिंगणात असल्याने मतांची विभागणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणूक आयोग व प्रशासनाकडून अर्ज माघारी प्रक्रियेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. आज संध्याकाळपर्यंत अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीतील खरे राजकीय समीकरण समोर येणार आहे.