छाननीनंतरच्या यादीतून अमोल शिंदेंचे नाव गायब; महापालिका निवडणूक कार्यालयाचा गोंधळ उघड
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज छाननीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवार यादीतून एका वैध उमेदवाराचे नाव वगळले गेल्याचा प्रकार समोर आल्याने निवडणूक प्रशासनाची गंभीर चूक उघडकीस आली आहे. शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख तथा उमेदवार अमोल शिंदे यांचे नाव छाननीनंतरच्या अधिकृत यादीत नसल्याचे आढळून आल्याने निवडणूक कार्यालयात एकच खळबळ उडाली.
प्रभाग क्रमांक ७-ड (सर्वसाधारण) मधून अमोल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज छाननी दरम्यान त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सद्यस्थितीतील यादीत त्यांचे नाव नसून अन्य उमेदवाराचे नाव नमूद करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
हा प्रकार लक्षात येताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यालयात धाव घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण बनल्याने खबरदारीचा उपाय म्हणून निवडणूक कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणात अमोल शिंदे यांच्या बाजूने काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारीही निवडणूक कार्यालयात उपस्थित राहिले. अमोल शिंदे व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक दोन विजया पांगारकर यांची भेट घेऊन यादीतील त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत उमेदवारांची नावे टायपिंग करताना चूक झाल्याचे निवडणूक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. संबंधित चूक तातडीने दुरुस्त करून अमोल शिंदे यांचे नाव समाविष्ट असलेली दुरुस्त उमेदवार यादी नव्याने प्रसिद्ध करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. अखेर काही वेळातच सुधारित यादी जाहीर करण्यात आली.
मात्र, यापूर्वी एबी फॉर्म संदर्भात निर्माण झालेला वाद आणि आता उमेदवार यादीतील ही चूक, यामुळे महापालिका निवडणूक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केवळ टायपिंगची चूक म्हणून हा प्रकार दुर्लक्षित करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत शंका उपस्थित झाल्या असून, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

More Stories
दुधनी नगरपालिकेत सत्तांतराचा उत्साह; प्रथमेश म्हेत्रेंनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, जिलानी नाकेदार उपनगराध्यक्ष
“स्वाभिमानाने जगायचे असेल तर राष्ट्रवादी (SP) हाच मार्ग”- लक्ष्मणराव ढोबळे: दक्षिण सोलापूर कार्याध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची नियुक्ती
१० जानेवारीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेकडे सोलापूरकरांचे लक्ष; नव्या विकास घोषणांची उत्सुकता