सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १५ मोटारसायकलींसह सराईत चोर जेरबंद

सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १५ मोटारसायकलींसह सराईत चोर जेरबंद
सोलापूर : शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर गुन्हे शाखेने कारवाई करत सराईत आंतरजिल्हा मोटारसायकल चोराला अटक केली. आरोपीकडून एकूण १५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे ४ लाख ४५ हजार रुपये आहे.

सचिन अंकुश कात्रे (वय ४०, मुळ रा. मसोबाची वाडी, ता. वाशी, जि. धाराशिव; सध्या रा. अंबिका चौक, बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीची ओळख पटवली.
गोपनीय माहितीच्या आधारे विष्णू घाट परिसरातून आरोपीला नंबर प्लेट नसलेल्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने हुतात्मा स्मृती मंदिर परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच मागील सहा महिन्यांत अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यातून आणखी १४ मोटारसायकली चोरी केल्याचे उघड झाले.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व स.पो.नि. शैलेश खेडकर यांच्या पथकाने केली.


