इराणवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ सोलापुरात माकपचे तीव्र आंदोलन; ट्रम्प-बेंजामिनच्या पुतळ्याचे दहन
सोलापुरात माकपचा आक्रमक निषेध मोर्चा

इराणवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ सोलापुरात माकपचे तीव्र आंदोलन; ट्रम्प-बेंजामिनच्या पुतळ्याचे दहन
सोलापुरात माकपचा आक्रमक निषेध मोर्चा
सोलापूर (प्रतिनिधी):– इराणवरील सुरू असलेल्या लष्करी कारवायांच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या निदर्शनांमध्ये कार्यकर्त्यांनी काळे झेंडे, काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी करत युद्धविरामाची मागणी केली. आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर आणि जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख मेजर यांनी केले.

माध्यमांशी बोलताना कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेले हल्ले हे त्या देशाच्या सार्वभौमत्वावर उघड आक्रमण असल्याचा आरोप केला. या कारवायांमुळे मध्यपूर्वेतील तणाव तीव्र झाला असून जागतिक शांततेसमोर गंभीर संकट उभे ठाकल्याचे त्यांनी नमूद केले.
युद्धामुळे निरपराध नागरिकांचे जीव जात आहेत, तेलाच्या किमती वाढत असून महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचेही त्यांनी सांगितले. संवाद आणि शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच मतभेद मिटवावेत, अशी भूमिका माकपने मांडली.

आडम मास्तर यांनी केंद्र सरकारला आवाहन करताना भारताने आपल्या निर्भीड परराष्ट्र धोरणाची परंपरा जपत या हल्ल्यांचा स्पष्ट शब्दांत निषेध करावा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तात्काळ युद्धविरामासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. भारत हा शांतता आणि सहअस्तित्वाचा पुरस्कर्ता देश असून त्याने ठाम युद्धविरोधी भूमिका जाहीर करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निदर्शनादरम्यान माकपने खालील मागण्या केल्या
* इराणवरील सर्व लष्करी हल्ले तात्काळ थांबवावेत
* तातडीने युद्धविराम जाहीर करून शांततापूर्ण चर्चेला सुरुवात करावी.
* आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेद्वारे तोडगा काढावा.
* भारत सरकारने स्पष्ट युद्धविरोधी भूमिका जाहीर करावी.
* साम्राज्यवाद व आक्रमणाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष अधिक तीव्र करावा
जिल्हा परिषद पुनम गेट येथून आंदोलनाची सुरुवात झाली. “युद्ध नको, शांतता हवी” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. काळे झेंडे फडकावत करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

आंदोलनादरम्यान काही हिंदुत्ववादी संघटनांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माकपने केला. त्यानंतर पोलिस आणि काही कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ झटापट झाल्याचेही सांगण्यात आले. मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते कॉ. एम. एच. शेख, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, अॅड. अनिल वासम, दत्ता चव्हाण, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी, नरेश दुगाणे, दाऊद शेख, अकील शेख, मल्लेशाम कारमपुरी, अशोक बल्ला, वीरेंद्र पद्मा, सनी शेट्टी, बालकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, अभिजित निकंबे, रफिक काझी, वसीम देशमुख, आसिफ पठाण, प्रदीप मरेड्डी, तबसुम शेख, मोहन कोक्कुल, अफसाना बेग आदींचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. अनिल वासम यांनी केले, तर पक्षाची अधिकृत भूमिका कॉ. एम. एच. शेख यांनी ली.



